खेड/मंचर : घोडीवर बसेन... घोड्यावर बसेन... असे दावे अनेकांनी केले. मात्र, बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी आम्ही न्यायमंदिरात लढाई लढली. दावा करणार्यांनी मात्र काहीच केले नाही, अशी टीका माजी खासदार तसेच म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.
बैलगाडा शर्यत बंदीविरोधात चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकात केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आढळराव पाटील यांच्यासह 67 जणांना राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी (दि. 17) निर्दोष असल्याचा निर्णय दिला. तब्बल 25 वर्षांनी लागलेल्या या निकालावर आढळराव पाटील यांनी रविवारी (दि. 18) लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली. यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, मंचरचे माजी उपसरपंच सुनील बाणखेले, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, शिवाजी राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतबंदी, त्यानंतर झालेली आंदोलने, राजकीय तोटा, याबाबत आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले मी केले... म्हणणारे अनेक झाले. त्यांनी राजकीय पोळी भाजून घेतली. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे वगळता बैलगाडा शर्यतीसाठी कोणीही रस्त्यावर उतरले नाही. केसेस अंगावर घेतलेल्या नाहीत.
या क्षेत्रातील श्रेयवादातून आम्हाला गोवण्यात आले होते. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अशा केसेस मागे घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर म्हणजे दोन वर्षांनी 307 (दंगल) कलम पोलिसांनी लावले. यामागे नेमके कोण होते? कुणाच्या सांगण्यावरून केले? याबाबत माहिती नाही.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलन होऊ शकते. असे झाल्यास विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि तुमच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच होऊ शकते. आपण पक्ष बदलणार का? तुमचे आणि शिंदे सेनेचे लागेबांधे पूर्वीप्रमाणेच आहेत का? यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, कारण असेल तर डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका करायला मागे-पुढे पाहणार नाही. माझे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. राजकीय घडामोडी काहीही होवोत, मी त्यात बदल करीत नाही.
मात्र, मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. भविष्यात राजकीय स्थिती निर्माण झाली, तर याच पक्षाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. राज्यात सध्याची राजकीय समीकरणे विचारात घेता येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका सगळेच पक्ष लढवतील. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे आढळराव पाटील म्हणाले.