

पुणे : 'अयोध्येत साकारणारे भव्य राम मंदिर, कलम 370 हटविल्यानंतर मोकळा श्वास घेणारे काश्मीर, विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रांत सुरू असलेली घोडदौड आणि भारतीय संस्कृती-विचारांचा जगभर वाढणारा दबदबा, हे सर्व 'याचि देही याचि डोळा' पाहणे म्हणजे आयुष्यभर केलेल्या कष्टांचे चीज झाल्यासारखे आहे,' अशी भावोत्कट प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे कसब्यातील माजी नगरसेवक देत होते. निमित्त होते पोटनिवडणुकीसाठी माजी नगरसेवकांच्या एकत्रीकरणाचे. पक्षाच्या कठीण काळात लोकसेवा करणारे व वयाची साठी-सत्तरी ओलांडलेले नगरसेवक भरभरून भावना व्यक्त करीत होते.
भाजपची सर्वांत मोठी ताकद ही पक्षनिष्ठा आणि संघटनेप्रती समर्पण यात आहे, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय कसबा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत नुकताच आला. पक्षाने निमंत्रण दिले आणि त्याला प्रतिसाद देत अनेक माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहिले. यात सर्वांत आघाडीवर होत्या 92 वर्षांच्या मीराताई पावगी आणि 88 वर्षांचे वसंतराव प्रसादे. हे दोघेही दोन मजले चढून या बैठकीत उत्साहाने दाखल झाले.
त्यांच्यासोबत सुहास कुलकर्णी, ज्योत्स्ना सरदेशपांडे, ज्योती पवार, उदय जोशी, शुभदा जोशी, प्रतिभा ढमाले, रमेश काळे, बाळासाहेब किरवे, उज्ज्वला पावटेकर, दिलीप काळोखे, सुरेखा पाषाणकर यांच्यासह कसबा मतदारसंघातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. या सर्वांनी हेमंत रासने यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
'संसदेत अगदी बोटावर मोजण्याइतके खासदार असल्यापासून आम्ही भाजपासाठी काम करत आहोत. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयींनंतर 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचे पूर्ण बहुमताचे सरकार निवडून येणे हा आमच्यासाठी सुवर्णक्षण होता. भाजपाचा पुण्यात पहिला महापौर मुक्ता टिळकांच्या रूपाने होणे, हाही तेवढाच आनंददायी दिवस होता. गेल्या नऊ वर्षांत देशात, राज्यात आणि आपल्या शहरात झालेल्या आमूलाग्र बदलांचे आपण साक्षीदार आहोत.
कसबा हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला असल्याने या पोटनिवडणुकीतला हेमंत रासनेंचा विजय निश्चित आहे. तो प्रचंड मताधिक्याने व्हावा यासाठी आम्ही सगळे जण प्रचाराच्या मैदानात उतरलोय," असे वसंतराव प्रसादे म्हणाले. खासदार गिरीश बापट नियोजनात पक्के आहेत. ते सांगतात, 'कामाचे नियोजन आणि नियोजनाप्रमाणे काम करा' हा मंत्र आम्ही प्रचारात प्रत्यक्षात उतरवतो आहोत अशीही भावना उपस्थित माजी नगरसेवकांनी व्यक्त केली.