

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा वाढता उपद्रव कायम आहे. शेतकरी, मेंढपाळांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत. त्यात आता ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्याने यामध्ये आणखी नव्याने भर पडली आहे. वन विभागासमोर आता बिबट्यांच्या हल्ल्यांचे आव्हान उभे राहिले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, शिंगवे, काठापूर, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे हा भाग बिबटप्रवण क्षेत्रात येतो. या गावांमध्ये शेतकरी, मेंढपाळांच्या जनावरांवर बिबट्यांचे हल्ले कायमच होत आहेत. त्यातच आता या भागात कार्यक्षेत्र असलेल्या भीमाशंकर, विघ्नहर या सहकारी साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. उसाचे शेत हीच बिबट्यांची खरी लपण जागा आहे. उसाच्या सर्वाधिक क्षेत्रांमुळे या भागात बिबट्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. आता ऊसतोड वेगाने सुरू झाली आहे.
यामुळे बिबट्यांचा अधिवास संपणार आहे. बिबटे सैरभैर होऊन पाळीव जनावरे, माणसांवर हल्ल्यांच्या घटना देखील घडू शकतात. येथून जवळच असलेल्या पिंपरखेड (ता. शिरूर) येथे ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळून आले. त्यामुळे ऊसतोडीचे काम थांबविण्यात आले. अशा घटना या दरवर्षीच ऊसतोडीच्या हंगामात घडत असतात. शेतात आढळलेले बछडे पुन्हा बिबट मादीच्या कुशीत सुखरूपपणे सोडण्याची जबाबदारी वन विभागाला पार पाडावी लागते. परिणामी, ऊसतोडणी हंगामामुळे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे.
वळती परिसरात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर होणारे वाढते हल्ले व पिंजरे लावण्यात वन विभागाकडून होणारे दुर्लक्ष, यामुळे वळती ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
– आनंद वाव्हळ, सरपंच, वळती