खडकवासला धरणतीरावर बहरली वनराई; विविध फळे, फुलांच्या झाडांची पर्यटकांना भुरळ

खडकवासला धरणतीरावर बहरली वनराई; विविध फळे, फुलांच्या झाडांची पर्यटकांना भुरळ

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : खडकवासला धरणतीरावरील खडकवासला, जांभली, खानापूर, गोर्‍हे येथील ओसाड रानात बहरलेल्या विविध जातींच्या फळ, फुलांच्या वनराईची पर्यटकांना भुरळ पडली आहे. पर्यटकांसह शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, पर्यावरणप्रेमींचे हे ठिकाण अभ्यास केंद्र बनले आहे. वनराईच्या परिसरात वन्यजीव, जलचर प्राण्यांचे जवळून दर्शन होत आहे. पुणे-पानशेत रस्त्यालगत असलेल्या खडकवासला धरणतीरावरील पडीक जागेत हजारो बांबूंची लागवड करण्यात आली आहे. तसेच विविध वृक्षांची लागवड केली होती.

आठ-दहा वर्षांत येथे आता घनदाट जंगल तयार झाले आहे. गोर्‍हे खुर्द येथील एसकेएफ नॉलेज पार्क, जांभली येथील कमिन्स नक्षत्र गार्डन, खानापूर येथील जंगल पार्क आदी ठिकाणी निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या अथक परिश्रमातून खडकवासला धरण पुनरुज्जीवन उपक्रमांतर्गत ग्रीन थंब संस्थेच्या पुढाकाराने धरणतीरावर उभारण्यात आलेल्या या वनराई प्रकल्पात स्थानिक तसेच परगावचे विद्यार्थी पर्यावरण शिक्षणाचे धडे घेत आहेत.

खडकवासला धरणातील गाळ काढून धरणतीरावर पानशेतजवळील कुरण बुद्रुक, जांभली गोर्‍हे, गोहे खुर्द, खानापूर आदी ठिकाणच्या पडीक जमिनीवर सेवाभावी संस्था व लोकसहभागातून उभारण्यात आलेले वनौषधी, फळबाग, गार्डन, नॉलेज पार्क व कमी जागेतील जंगल आदी वनस्पती प्रकल्प बहरले आहेत.

ब्रिटीश राजवटीत बांधलेल्या खडकवासला धरणात वर्षानुवर्षे साठलेला लाखो टन गाळ काढण्यात आला. धरणतीरावरील मोठमोठे खड्डे, दलदलीच्या ओसाड जागेवर गाळ टाकून वृक्ष लागवड केली. त्यामुळे शासनाच्या मालकीची जवळपास पाचशे एकर जमीन वनराईने बहरली आहे. या जागेतील अतिक्रमणे रोखण्यात काही प्रमाणात यशही आले.

                                                     – सुरेश पाटील, निवृत्त कर्नल

वनस्पती नॉलेज पार्क…
धरणतीरावर वनौषधी, जंगलातील वनस्पती, वनस्पती नॉलेज पार्क, नक्षत्र पार्क, विविध जातींच्या देशी वृक्षांसह फळझाडे आहेत. डिजिटल फलकांवर तसेच ठिकठिकाणी वनस्पतींची तसेच पक्षी, जलचर प्राण्यांची माहिती देणारे फलक लावले आहेत. कमी क्षेत्रात आंबा, नारळ, चिकू आदी फळझाडे, देशी वृक्षांची लागवड करून जंगल प्रकल्प उभारले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news