

आशिष देशमुख
पुणे : शहरात सुरू असलेल्या 'जी-20' परिषदेत विदेशी पाहुण्यांना खास पुणेरी भरडधान्याची भुरळ पडली आहे. शहरातील शर्मिला ओसवाल यांनी ज्वारीपासून तयार केलेले चिप्स, पास्ता अन् नूडल्सवर त्यांनी पहिल्या दिवशी ताव मारला. सोमवारी सकाळी 9 वाजता हॉटेल जे. डब्ल्यू. मेरिएटच्या भव्य सभागृहात 'जी-20' परिषदेचे उद्घाटन झाले. त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाही. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत तळमजल्यावरील सजविलेल्या सभागृहात ही परिषद सुरू आहे.
तेथे चारच स्टॉल लावण्यात आले आहेत. यात भीमथडी, एमआयडीसी, एमटीडीसी व गुड मॉम या शहरातील शर्मिला ओसवाल यांचा भरडधान्यापासून तयार केलेल्या उत्पादनांचा स्टॉल आहे. परिषदेच्या उद्घाटनानंतर विदेशातून आलेल्या प्रतिनिधींनी या स्टॉलवर गर्दी केली. कोरिया, जपान, जर्मनीसह अमेरिकन प्रतिनिधींनी ज्वारी व बाजरीपासून तायर केलेले चिप्स, पास्ता, नूडल्सवर ताव मारला.
हनी कोटेड नूडल्स भावले…
ओसवाल यांनी सांगितले की, विदेशात भारतीय भरडधान्याला मागणी वाढत आहे. मी महाराष्ट्र मिलेट मिशन हा स्टॉल या ठिकाणी लावला. त्याला विदेशी पाहुण्यांनी जोरदार दाद दिली. विदेशात प्रत्येक पदार्थात मैदा असतो. पण, आपले भरडधान्य शुद्ध स्वरूपाचे असते. हनी कोटेड नूडल्स त्यांना आवडले. कोरिया, जपान, अमेरिकेतून आलेल्या प्रतिनिधींनी ज्वारी, बाजरीचे चिप्स, पास्ताही खाल्ला. महाराष्ट्रात ज्वारी खूप मोठ्या प्रमाणावर तयार होते, त्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देऊन भरडधान्याचे मोठे उत्पादन करण्यास वाव दिला पाहिजे. आपल्या देशात कर्नाटक, आसाम ही राज्ये भरडधान्य उत्पादनात पुढे गेली आहेत.
दिल्लीचे निमंत्रण…
गुड मॉम नावाने शर्मिला ओसवाल यांचे भरडधान्याचे स्टार्टअप असून, त्या 2023 च्या भारताच्या भरडधान्याच्या अग्रणीदूत (ब—ँड अम्बेसिडर) आहेत. त्यांच्या स्टॉलवर येऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कौतुक केले. त्यांच्या विविध उत्पादनांची माहिती घेतली व दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले.