स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी गावांमध्ये अभ्यासिका सुरू करणार

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी गावांमध्ये अभ्यासिका सुरू करणार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बारा गावांमध्ये जिल्हा परिषदेकडून बारा अभ्यासिका सुरू करण्यात येत आहेत. शाहू-फुले-आंबेडकर ग्राम अभ्यासिकांपैकी दहा अभ्यासिकांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून, तर दोन अभ्यासिकेंसाठी जिल्हा नियोजनकडून निधी देण्यात आला. बारापैकी सर्व अभ्यासिका तयार असून, फर्निचरचे काम सुरू असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली. सर्व आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

तसेच या अभ्यासिकेच्या ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षांबरोबर अवांतर वाचनासाठी देखील पुस्तके उपलब्ध होणार आहेत. चार लाख रुपये किमतीची पुस्तके समाजकल्याण विभागाकडून अभ्यासिकांना देण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुणे शहरात अनेक विद्यार्थी येतात. परंतु, हीच सुविधा गावात मिळाली, तर सोईस्कर ठरेल, या उद्देशाने अभ्यासिकांची उभारणी करण्यात आली आहे. अभ्यासिकेचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून केले जाईल.

अभ्यासिकेमध्ये खेडमधील शेलपिंपळगाव, कळूस, भोर तालुक्यांतील केंजळ, वेल्हे, आंबेगावातील निरगुडसर, दौंड तालुक्यातील खुटबाव, हेवलीमधील लोणीकंद, शिरूरमधील न्हावरा, बारामती तालुक्यात सुपा, इंदापूरमधील अंथुर्णे, भिगवण, पुरंदर तालुक्यातील वाल्हा गावांमध्ये अभ्यासिका तयार करण्यात आल्या आहेत. या अभ्यासिकेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याशिवाय स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरलेले आणि मुख्य परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मुला-मुलींना स्वतंत्र व्यवस्था असून, एका अभ्यासिकेत पन्नास विद्यार्थी बसू शकणार आहेत.

नाममात्र शुल्क आकारणार
अभ्यासिकेमध्ये काही सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा खर्च भागविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. त्यातून खर्च भागविला जाईल. तेथील विद्यार्थ्यांची एक समिती स्थापन केली जाईल. सहायक गटविकास अधिकारी याचे प्रमुख असतील, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकार प्रवीण कोरगंटीवार यांनी दिली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अभ्यास केंद्रात सुविधा मिळतील. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके देखील येथे उपलब्ध केली जाणार आहेत. याचा गरीब विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
                                                   आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news