सांगवी, पिंपळे गुरवमधील पदपथांना अतिक्रमणांचा विळखा
संतोष महामुनी :
नवी सांगवी : येथील पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने वर्दळीच्या रस्त्यांवरून नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. वाहने पार्किंग, दुकानांचे फलक, विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तू, ज्यूस सेंटर, स्नॅक्स सेंटर, वडापाव, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, भंगारवाले अशा व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमणे केली आहेत. सांगवी, पिंपळे गुरवमधील पदपथ नक्की कोणासाठी? पादचार्यांसाठी की विक्रेत्यांसाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नवी सांगवी पिंपळे गुरव परिसरात प्रामुख्याने फेमस चौक, साई चौक, कृष्णा चौक, काटे पुरम चौक, मयूर नगरी, डायनासोर गार्डन, भगतसिंग चौक, रामकृष्ण चौक, एम. एस. काटे चौक आदी ठिकाणी पदपथ आहे की नाही हेच समजत नाही. अशी परिस्थिती नवी सांगवी, पिंपळे गुरवमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे अत्यंत रहदारीच्या रस्त्यांवरून, भर चौकातून नाईलाजाने पादचार्यांना धोका पत्करून पदपथ सोडून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी तसेच अतिक्रमण विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रस्त्याला लागून पदपथ तयार केले आहेत. सकाळी व सायंकाळच्या सुमारास नागरिक, ज्येष्ठ नागरिक नियमित शारीरिक व्यायाम करण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी पायी चालत घराबाहेर पडत असतात. मात्र, भर चौकात येताच नागरिकांना अनेकदा पदपथ सोडून रस्त्यावर उतरून जीव मुठीत धरून पायी चालावे लागत आहे.
येथील चौकातील पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेते अक्षरशः खुर्च्या, टेबल मांडून व्यवसाय करताना दिसून येत आहेत. फळ विक्रेते, भाजी विक्रेते अनेकदा पदपथ काबीज करून पदपथावरच भाज्यांचे ढिगारे मांडत खरेदी विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे नेमका पदपथ आहे तरी कुणासाठी विक्रेत्यांसाठी की, पायी चालणार्या नागरिकांसाठी, आम्ही नेमके चालायचे कसे हे एकदा महापालिकेने स्पष्ट करावे.
स्मार्ट पदपथावर व्यावसायिकांचे स्मार्ट अतिक्रमण
दुकानदार सकाळीच आपल्या दुकानातील साहित्य पदपथावर आणून मांडतात. यामुळे पादचार्यांनी चालायचे कोठून हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालल्याशिवाय पर्याय नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी रस्ता वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरला जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना आपल्या हक्काच्या पदपथावरून चालणेही कठीण बनले आहे. दुकानदार मात्र, आपल्या दुकानातील माल ऐटीत पदपथावर लावतात. नवी सांगवी, पिंपळे गुरवमधील पदपथ व्यावसायिकांनी बळकावल्याने पादचार्यांना वर्दळीच्या मार्गावरून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
व्यावसायिक घेतात जागेचे भाडे
अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला पान स्टॉल, पत्र्याचे शेड तयार करून ते व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. फेमस चौक, काटे पुरम चौक, रामकृष्ण चौक आदी ठिकाणी पदपथावर अतिक्रमण करून आपले बस्तान बसवले आहे. महापालिकेच्या संबंधित प्रशासनाकडून पदपथांवरील अतिक्रमणे काढून अनेकदा अतिक्रमण पथक कारवाई करीत आहे. मात्र, कारवाईनंतर तासाभरात 'जैसे थे' परिस्थिती पाहावयास मिळते.

