पुणे : शिवराजला शासकीय नोकरी देण्यासाठी पाठपुरावा ; माजी खा. आढळराव पाटील यांची घोषणा

पुणे : शिवराजला शासकीय नोकरी देण्यासाठी पाठपुरावा ; माजी खा. आढळराव पाटील यांची घोषणा
राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने कुस्तीमध्ये दैदीप्यमान कामगिरी केली आहे. शिवराजने हिंद केसरी, ऑलिम्पिकमध्ये यश मिळवावे यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल. याशिवाय शिवराजला शासकीय सेवेत संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत, अशी घोषणा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राक्षेवाडी येथे केली.
राक्षेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मल्ल शिवराज काळुराम राक्षे हा नुकताच महाराष्ट्र केसरी झाला. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. गेले दोन दिवस राक्षेवाडी अनेक मान्यवरांच्या आगमनाने झळकून गेली आहे. सोमवारी (दि. १६) माजी खासदार तसेच बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन शिवराज यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश शिवराज यांना सुपूर्द केला.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजुशेठ जवळेकर, सागर काजळे, दत्ता गिलबिले, भैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष, तसेच संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी शिवराज यांच्या मातोश्री व राक्षेवाडीच्या सरपंच सुरेखाताई राक्षे, वडील काळूराम राक्षे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे ,पोलिस पाटील पप्पूशेठ राक्षे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news