

सुवर्णा चव्हाण
पुणे : महाराष्ट्राची माती अस्सल लोककलेने समृद्ध असून, या कला लोककलावंतांमुळे जिवंत आहेत… परंतु या लोककलावंतांनाच सध्या निम्म्या मानधनावर काम करावे लागत आहे. कोरोनामुळे लोककलावंतांचे 2 वर्षे काम बंद होते, पण, त्याची झळ अजूनही लोककलावंत सहन करीत असून, यात्रा-जत्रा अन् विविध ठिकाणी काम मिळत असले तरी मानधन तुटपुंजे मिळत आहे.
तमाशा, वाघ्या मुरळी, गोंधळी, वासुदेव, पोवाडा, भारुड, पोतराज…. अशा विविध लोककला सादर करणार्या कलावंतांना काम असले तरी ते निम्म्या मानधनावर करण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे लोककलावंतांचे काम बंद होते. या काळात त्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. आता सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर लोककलावंतांना काम मिळणे सुरू झाले आणि लोककलावंत नवीन उर्जेने काम करू लागले आहेत; परंतु कोरोनामुळे संस्थांनाही आर्थिक झळ सोसावी लागल्याने लोककलावंतांना निम्मेच मानधन दिले जात असून, काही कलावंत हाल सोसत आहेत.
तमाशा कलाकार रघुवीर खेडकर म्हणाले, 'यात्रा-जत्रांमध्ये तमाशाचे कार्यक्रम होत आहेत; परंतु काही लोकलावंतांना निम्मेच मानधन मिळत असून, पुरेसे पैसे दिले जात नाहीत अशी स्थिती आहे. आमच्या तमाशा फडाला काही महिन्यांपूर्वी सरकारकडून 2 लाख रुपयांचे कोरोना अनुदान पॅकेज मिळाले आहे; परंतु बाकीच्या लोककलावंतांना, फडाला ते मिळालेले नाही. उर्वरित लोककलावंतांना ते लवकरात लवकर द्यावे. कलावंतांना या पॅकेजची गरज आहे.' राहुल पवार म्हणाले, 'मी वाघ्या-मुरळी ही लोककला सादर करतो.
आता काम मिळत असले तरी मानधन मात्र कमीच आहे. कोरोना काळात बसलेल्या आर्थिक फटक्याचे कारण देत संस्थांकडून निम्मेच मानधन देण्यात येत आहे. पूर्वी एका कार्यक्रमासाठी 15 ते 16 हजार रुपये मिळायचे. पण, आता 8 ते 10 हजार रुपये दिले जातात. 65 टक्के मानधन दिले जात असून, 35 टक्के मानधन कमी झाले आहे.'
कोरोनामुळे संस्थांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे लोककलावंतांना ते काम देत असले
तरी त्यांना कमी मानधन दिले जात आहे. काही कलावंतांना कमी-अधिक प्रमाणात काम मिळत आहे. पूर्वी 25 हजार रुपयांत काम करणारे लोककलावंत आता 5 हजार रुपयांत कार्यक्रम करीत आहेत. कर्ज फेडण्याइतपतही पैसे मिळत नसल्याची काही जणांची स्थिती आहे. कोरोना अनुदान पॅकेजही सरकारने दिलेले नाही. लोककलावंतांना सरकारने अनुदान दिले पाहिजे.
– हेमंत मावळे, शाहीर