तलाठी, मंडल अधिकार्‍यांच्या कामावर राहणार लक्ष; भूमि अभिलेख विभागाचे आदेश

तलाठी, मंडल अधिकार्‍यांच्या कामावर राहणार लक्ष; भूमि अभिलेख विभागाचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जमीन खरेदी-विक्रीच्या दस्तावरून सातबा-यावरून नोंद घेणे, वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, बोजा दाखल किंवा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे यासह इतर विविध कामांसाठी फेरफार नोंदविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने किंवा तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज दाखल करावा लागतो. तलाठी त्या नोंदीचा फेरफार करून तो मान्यतेसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे ऑनलाइन पाठवितो. मात्र, बहुतांश तलाठ्यांकडून फेरफार प्रलंबित ठेवले जात असल्याची बाब पुढे आली आहे.

त्याबाबत वाद किंवा हरकत नसेल, तर नियमानुसार एक महिन्यात या दोन्ही नोंदी झाल्या पाहिजेत. परंतु काही तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता भूमि अभिलेख विभागाने तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या कामाची चौकट निश्चित केली आहे. परिणामी, नागरिकांनी केलेला अर्ज तलाठ्याने पाहिला आहे का, अर्जावर कोणी हरकत घेतली आहे का? तलाठ्याने अर्ज मंडल अधिकार्‍याकडे पाठविला आहे की नाही? या कामांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

भूमि अभिलेख विभागाने गावनिहाय दाखल झालेल्या प्रलंबित फेरफारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव हे निवडावे लागणार आहे. तसेच सातबारा फेरफार, फेरफार किंवा मोजणी नोटीस यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.

त्यानंतर सर्च केल्यानंतर सर्व माहिती स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे कोणती नोंद कधी मंजूर केली, कोणती नोंद प्रलंबित आहे, अर्जाच्या आधी कोणाची नोंद मंजूर केली आहे, हे नागरिकांना समजणार आहे. त्यामुळे तलाठी, मंडल अधिकार्‍यांच्या कामकाजात पारदर्शकता येणार आहे. तसेच अर्जाच्या क्रमाने तलाठी यांच्याकडील फेरफार नोंद मंजूर होईल, असे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news