शहरासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री तसेच बाहेर राज्यातून होणारी वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले असून दारूची दुकाने, बारमधून रोज किती दारू विकली जाते, याची माहिती रोजच्या रोज उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे.
शहरासह जिल्ह्यातील सर्व उत्पादन शुल्क विभागाची पथके गस्त घालत आहेत. तर प्रत्येक दारू विक्रेते, वाईन शॉपसमोर सीसीटीव्ही सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देऊन तेथील चित्रीकरण तपासले जात आहे.
यासाठी एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून, त्या माध्यमातून नियंत्रण केले जात आहे. राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने सर्वच विभागांकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. निवडणुकीत दारू आणि पैशांचा मोठा वापर गृहीत धरून त्यादृष्टीने संबंधित विभाग कारवाई करतो.
राज्याचा उत्पादन शुल्क विभागदेखील अॅक्शन मोडमध्ये आहे. या विभागाची निवडणुकीच्या काळात मोठी भूमिका आहे. काही उमेदवारांकडून मतदार आणि कार्यकर्त्यांना मतदान आणि प्रचारासाठी दारूचे प्रलोभन दाखवले जाते. त्यामुळे या काळात दारू विक्रीत मोठी वाढ होते. तर, बाहेरच्या राज्यातून दारू वाहतूक होण्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व दारू विक्रेते, बीअरबार, वाईन शॉपीसमोर असलेल्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण उत्पादन शुल्क विभागाकडून तपासले जात आहे. याचे नियंत्रण करण्यासाठी विभागाने एक कंट्रोल रूम तयार केली आहे.
या माध्यमातून संबंधित ठिकाणी होणा-या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होत आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांकडून ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे.