नारायणगाव: ऐन गणेशोत्सवाच्या काळात फुलांची मोठी मागणी असून, बाजारभावदेखील वाढलेले आहेत. असे असताना जुन्नर तालुक्यातील निमदरीचे शेतकरी गोविंद सदाशिव भगत हे निमगाव तर्फे महाळुंगे येथे करत असलेल्या खंडाच्या शेतातून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी सुमारे 500 किलो शेवंतीची फुले चोरून नेली. या प्रकारामुळे शेतकर्याचे एक लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
गोविंद भगत हे दुसर्याच्या जमिनीवर खंडाने शेती करून उपजीविका चालवतात. यंदा गणेशोत्सवाच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळेल या अपेक्षेने त्यांनी एक एकरावर सफेद शेवंतीची लागवड केली होती. उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईत झाडे जपण्यासाठी त्यांनी चूळ घालून मेहनत घेतली होती. (Latest Pune News)
सध्या शेवंतीला 230 रुपये किलो दर मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शेतातून फुले तोडून नेली. दुसर्या दिवशी मुंबईला फुले पाठवण्याचा विचार सुरू असतानाच चोरी उघडकीस आली. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज तपासूनही चोरट्यांचा काहीच मागोवा लागलेला नाही.
भगत म्हणाले, ’माझ्याकडे स्वतःची शेती नाही म्हणून खंडाने जमीन घेऊन फुलशेती करतो. फुलांना भाव मिळेल या आशेवर घरच्यांशी चर्चा करून मुंबईला फुले पाठवायची तयारी केली होती. पण सकाळी शेतात गेल्यावर फुले चोरीला गेल्याचे दिसले. यामुळे माझे लाखाहून अधिक नुकसान झाले.’