

खोर: ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ वेगाने रुजली असून मुलं-मुली उच्च शिक्षित, पदवीधर व प्रशिक्षित होत आहेत. मात्र, या कष्टानंतरही अपेक्षित रोजगार उपलब्ध न झाल्याने ‘शिक्षण आहे, पण नोकरी नाही’ ही जळजळीत परिस्थिती आजच्या तरुणाईला पोखरत चालली आहे.
अनेक तरुण अभियंता, बी.ए., एम.ए. झाले तरी शहरांच्या दारात नोकरीसाठी चकरा मारताना दिसतात. स्पर्धा परीक्षांच्या मागे हजारो विद्यार्थी धावत आहेत, पण उपलब्ध जागा मोजक्याच असल्यामुळे शिकलेले बेरोजगार हे ग्रामीण समाजातील नव्याने उभे राहिलेले गंभीर संकट ठरत आहे. (Latest Pune News)
शिक्षण असूनही हातात काम नाही
शेतकरी कुटुंबांनी मुलांना मोठ्या अपेक्षेने पदवी मिळवून दिली, पण आज पुन्हा त्यांना शेतीकडेच वळावे लागत आहे. शिक्षण आणि कौशल्य यात मोठी दरी असल्याने खाजगी क्षेत्रही हात आखडता घेत आहेत. डिजिटल युग असूनही ग्रामीण भागातील तरुणांना संधींची दारे बंदच आहेत, हे वास्तव अत्यंत वेदनादायी आहे.
तरुणाईचा आक्रोश
‘आई-वडिलांनी कर्ज काढून शिक्षण दिलं, पण आज नोकरीसाठी पुणे-दिल्लीच्या वार्या कराव्या लागतात. गावाकडे काहीच संधी नाही’ असे सांगताना दौंड तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
नोकरीअभावी उद्भवणारे परिणाम
काही तरुण दारू व नशेच्या आहारी जात आहेत. काहींनी उद्योजकतेचा मार्ग निवडला, पण भांडवलाच्या अभावामुळे ते अडखळलेले दिसतात.
सरकारकडून अपेक्षा कायम
स्थानिक पातळीवर औद्योगिक क्षेत्र आणून रोजगारनिर्मिती होणे गरजेचे आहे. शिक्षणाचा दर्जा वाढला, पण रोजगाराच्या संधी न वाढल्यास सुशिक्षित बेरोजगारी हे समाजासमोरचे सर्वात मोठे संकट ठरणार आहे.
शिक्षणाचा दर्जा आणि उद्योगांच्या गरजा यामध्ये तफावत आहे. फक्त पदवी न घेता कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे. तेव्हाच बेरोजगारी कमी होईल आणि भविष्यातील तरुण रोजगाराच्या वाटेवर पुढे सरकतील.
- प्रा. वसंत इंगळे, उपप्राचार्य, श्री गोपीनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वरवंड, ता. दौंड