

पुणे: पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अतुल कदम (वय 39) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी सोनाली कदम (वय 31), तसेच तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अतुल यांची आई माधुरी कदम (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
अतुल आणि सोनाली यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. दरम्यान, अतुलला पत्नी सोनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी मैत्री संबंध असल्याची माहिती मिळाली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.
वादामुळे सोनाली वेगळी राहायला लागली. ती माहेरी निघून गेली. त्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा यांनी अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. अतुल यांनी गेल्या महिन्यात 15 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.