सासवड : विषारी दारूने पाच कुटुंब उद्ध्वस्त

सासवड : विषारी दारूने पाच कुटुंब उद्ध्वस्त

सासवड(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले सासवड शहर अत्यंत झपाट्याने विकसित होत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सासवड येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना जोर चढला आहे. घातक रसायनमिश्रित हातभट्टीची दारू सेवन केल्याने शहरातील साठेनगर भागात गेली चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू झाला असून, आणखी किती जणांचा जीव घेणार, असा सवाल भाजपचे शहर उपाध्यक्ष अमोल जगताप यांनी उपस्थित केला.

अमोल जगताप यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सासवड पोलिसांचे अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. या अवैध धंद्यांचा वेळीच तातडीने बीमोड करण्याची नितांत गरज निर्माण झाली असून, तशी मागणी सासवड शहरात जोर धरत आहे.

सासवड शहरातून परिसरातील इतर गावांना गावठी दारू पुरवली जाते. कमी कालावधीत मिळणारा पैसा अवैध दारू धंदेवाल्यांना निर्भीड बनवत आहे. त्यामुळे पैशांच्या जोरावर पोलिस यंत्रणा, शासकीय अधिकारी आपल्या खिशात आहे अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंबाची वाताहात झाली आहे.

त्यात शहरातील साठेनगर भागातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहीजण आजाराने अंथरुणाला खिळलेले आहेत. घरातील कर्तापुरुष दारूच्या आहारी गेल्याने हतबल झालेली पत्नी, लहान मुले यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सासवड पोलिस अधिकारी यांच्याकडून या कुटुंबांना न्याय मिळावा, हीच अपेक्षा अमोल जगताप व्यक्त केली.

पोलिसांसमोर मोठे आव्हान
पुरंदर तालुक्यातील अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यात रसायनमिश्रित हातभट्टी, देशी-विदेशी दारू विक्री त्याचप्रमाणे परवानगी नसताना टपर्‍यांमध्ये दारू विक्री करणे, चायनीज सेंटरवर दारू विक्री व पिण्यास परवानगी असणे हे प्रमाण वाढले आहे. हे अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news