

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : रोहित्रात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत 5 एकर डाळिंबाची बाग, पाईप, ठिबक संच जळून खाक होऊन शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नगर तालुक्यातील घोसपुरी येथे ही घटना घडली. घोसपुरी शिवारात बाबासाहेब नाना झरेकर यांनी 5 एकर क्षेत्रावर सुमारे 1500 डाळिंबाची झाडे लावली होती. या बागेजवळ असलेल्या शेताच्या कडेलाच मोळवस्ती क्र.2 चे रोहित्र आहे. या रोहित्रात रविवारी (दि.19) दुपारी 2 वाजता शॉर्टसर्किट झाल्यामुळे ठिणग्या उडून शेजारील गवताने पेट घेतला.
काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोळ शेतात पसरले. परिसरातील काही शेतकर्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी झरेकर यांना माहिती दिली. झरेकर कुटुंब तातडीने तेथे आले. शेतकर्यांसह झरेकर कुटुंबीयांनी उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत संपूर्ण 5 एकर डाळिंबाची बाग, तसेच पाईप, ठिबक संच जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळाल्यावर सोमवारी (दि.20) कृषी पर्यवेक्षक पूनम दिवे, कामगार तलाठी सचिन शिंदे, ग्रामसेवक देवकर यांनी सरपंच किरण साळवे, दादाभाऊ खोबरे, विजय भांबळ, प्रवीण झरेकर, मोहन इधाते यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. महावितरणचे सारोळा कासार उपविभागाचे अभियंता संदीप बराट यांच्यासह कर्मचार्यांनी पाहणी करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठविला. दुपारी महावितरणच्या निरीक्षक हर्षा दुसाणे यांनीही पाहणी केली. अकोळनेर उपकेंद्रातून घटनेच्या दिवशीचा एमआरआय काढून तो तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.