

पुणे: एटीएममधून पैसे काढणार्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून, चोरट्यांनी जबरदस्तीने एटीएम कार्ड हिसकावले. त्यानंतर एक लाख रुपयांची रोकड कार्डाद्वारे काढून घेतल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक बोपोडी भागात राहायला आहेत. ते शुक्रवारी (9 मे) खडकी बाजार परिसरात कामानिमित्त आले होते. खडकी बाजारातील एका बँकेच्या एटीएममध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले. (Latest Pune News)
एटीएमच्या बाहेर 20 ते 25 वर्षांचा चोरटा पाळत ठेवून थांबला होता. ज्येष्ठाच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. ज्येष्ठाने एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे बाहेर पडले नाहीत. त्यानंतर चोरट्याने त्यांना मदत करण्याचा बहाणा केला.
पैसे काढून देतो, असे सांगितले. मात्र फिर्यादींनी त्याला नकार दिला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातातील एटीएम कार्ड जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. त्यानंतर त्या एटीएम कार्डद्वारे 1 लाख 4 हजार 650 रुपये काढून घेतले.
फसवणूक करण्याचे प्रकार वाढले
एटीएममधून पैसे काढणार्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मध्यंतरी वारजे पोलिसांनी एटीएमधून पैसे काढणार्या नागरिकांची फसवणूक करणार्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना पकडले होते. चोरटे एटीएमच्या परिसरात पाळत ठेवतात. ज्या भागातून पैसे बाहेर येतात (कॅश डिस्पेन्स) तेथे लोखंडी पट्टी लावतात.
पैसे बाहेर न पडल्याने ज्येष्ठ नागरिक गोंधळात पडतात. त्यानंतर चोरटे ज्येष्ठांकडे मदतीचा बहाणा करतात. त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतात. चोरटे त्यांच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठांना देतात. एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा गैरवापर करून चोरटे रोकड चोरून नेतात.