

पुणे: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर गॅरेंटेड रिटर्न देण्याचे आमिष दाखवून शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचार्यासह दोघांची 58 लाख 30 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सुखसागरनगर (कात्रज) येथील 49 वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भारती शेअर मार्केट प्रा. लि. कंपनीचे संचालक रवींद्र भारती (वय 36, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर), अमोल वागज (वय 32, रा. लोणी काळभोर), चेतन गादेकर (वय 30, रा. बिबवेवाडी, सिद्धार्थनगर) या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भारती शेअर मार्केट कंपनीच्या मगरपट्टा सिटी हडपसर येथील कार्यालयात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पोलिस कर्मचारी आहेत. भारती शेअर मार्केट ही कंपनी शेअर मार्केटचे क्लास घेण्याबरोबरच मार्केटमधील गुंतवणुकीचे सल्ले देण्याचे काम करते. त्याच माध्यमातून फिर्यादींचा परिचय रवींद्र भारती याच्यासोबत झाला होता.
त्या वेळी भारती आणि त्यांच्या साथीदारांनी फिर्यादींना विश्वासात घेतले. फिर्यादींना आरोपींनी सेबीचा पीएमएस पाहण्याचा परवाना असल्याचे सांगितले. तसेच फोनमधील पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस लायसन्स दाखविले. आरोपीने आपल्यामार्फत शेअर खरेदी करण्याची माहिती मिळणार असल्याचे सांगून गुंतवणुकीवर गॅरेंटेड रिटर्न देण्याचे प्रलोभन दाखविले.
फिर्यादीकडून 43 लाख आणि अन्य एका व्यक्तीकडून 15 लाख असे पैसे घेतले. परंतु, आरोपींनी ठरलेल्या नियम आणि अटीनुसार गुंतवणूक न करत दोघांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींचा पीएमएस पाहण्याचा परवाना सेबीकडून बॅन केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आत्तापर्यंत रवींद्र भारती आणि त्यांच्या साथीदारांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीद्वारे दोघांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश जगदाळे करीत आहेत.