

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने रामनगर रस्त्यावर बापूजीबुवा चौकात पाठलाग करून दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार केला. ही धक्कादायक घटना रामनगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या गोळीबारात तरुणासह रस्त्यावरून जाणारा अल्पवयीन मुलगा बचावला आहे. योगेश चंद्रकांत डोळसे (वय 26) रा. पाण्याची टाकी चौक, रामनगर वारजे असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी योगेश चंद्रकांत डोळसे यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा तरुण सायंकाळी दुचाकीवरून घराकडे जात होता. त्याचवेळी त्याच्या ओळखीचा संशयित आरोपी कार्तिक इंगवले हा त्याच्या मित्रासह दुचाकीवरून रामनगरच्या दिशेने जात होता. दरम्यान, रामनगर येथील मारुती मंदिराजवळ आरोपी आणि फिर्यादी जवळ आले असता इंगवलेने फिर्यादीकडे पाचशे रुपयांची मागणी केली. त्यावर फिर्यादीने माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. पुन्हा चालत्या दुचाकीवरून पैसे मागितले.
दरम्यान, पैसे न दिल्याने आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करून रामनगर येथील वेताळ बुवा चौक येथे वाहतुकीच्या रस्त्यावर आला असता मागे वळून योगेश डोळसेवर गोळी झाडली. मात्र, फिर्यादी थोडक्यात बचावला. इंगवले हा सराईत गुन्हेगार असून, नुकताच तो मोक्का कारवाईतून जेलमधून बाहेर आला आहे. त्यांनतर पुन्हा त्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केली. शुक्रवारी रात्री इंगवलेने दुचाकीवरून जात असताना पाठीमागील दुचाकीस्वारावर गोळीबार केला.