

Pune Kedgaon Chouphula kala Kendra Firing Incident
केडगाव/ खुटबाव : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला जवळच्या वाखारी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात २१ जुलै रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात भोर वेल्हा मुळशीचे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यवत पोलिसांनी आमदारांच्या भावासह चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या घटने प्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी अशा ४ जणांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार २१जुलै रोजी वाखारी हद्दीतील न्यू अंबिका कला केंद्रात आरोपींनी आपल्या पिस्तुलातुन हवेत गोळीबार केला होता. ही घटना प्रसार माध्यमातुन प्रसिद्ध झाली होती त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. यावेळी पोलिसांनी या घटने प्रकरणी तपास सुरू केला होता मात्र पोलिसांना ठोस माहिती मिळत नव्हती. यावेळी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांना पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर ही घटना निदर्शनात आली. या गोळीबाराच्या घटनेत मात्र कोणीही जखमी झाले नाही. सर्व आरोपी हे मुळशी तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी प्रथम दर्शनी माहिती दिली.
आरोपींना अद्याप अटक केली नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यावेळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी साहय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे उपस्थित होते.