पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात शनिवारी (दि.१२) रात्री आठच्या सुमारास धावत्या मोटारीला आग लागल्याची घटना घडली. मोटारीतील चालकासह आतील सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोटार पूर्णपणे जळाली होती. यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने घबराट उडाली होती.
पुणे-सातारा रस्त्यावरुन स्विफ्ट डिझायर ही मोटार कात्रजकडे निघाली होती. पद्मावती बसथांब्याजवळ मोटारीतून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून वाहन चालकाने मोटार तत्काळ बाजूला नेली आणि मोटारीतील तीन जण त्वरीत बाहेर पडले. मोटारीने पेट घेतला. आग भडकल्याने घबराट उडाली होती व बघ्यांची गर्दीही झाली होती. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान सचिन शिंदे, शेखर येरफुले, संदीप गडसी, पंकज इंगवले, अविनाश लांडे आदी जवानांच्या पथकाने पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. मोटारीत शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली.