वाळुंजवाडी-लांडेवाडी परिसरातील डोंगराळ भागात वणवा
मंचर(ता.आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : वाळुंजवाडी ते लांडेवाडी परिसरातील डोंगराळ भागाला शनिवारी (दि.1) मोठ्या प्रमाणावर आग लागली. वणव्याने सुमारे एक किलोमीटर परिसरातील झाडे, गवत, सरपटणारे प्राणी जळून जंगल संपत्तीचे नुकसान झाले आहे. वणवा नियंत्रणात आणताना बचाव दलाचे दोघे किरकोळ जखमी झाले. सकाळी अकराच्या सुमारास वाळुंजवाडी परिसरात खासगी क्षेत्रात आग लागली. नंतर ती वाळुंज, वाळुंजवाडी ते लांडेवाडी अशी सुमारे एक किलोमीटर अंतरावरील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर पसरली.
वणव्यात हजारो झाडे, छोटे जीव, पक्षी, साप यांचा अंत झाला. डोंगराला आग लागल्याची माहिती कळताच सकाळी अकरापासून वनपाल संभाजी गायकवाड, शशिकांत मडके, वनरक्षक पूजा कांबळे, बचाव दलाचे मनोज तळेकर, मिलिंद टेमकर, नवीन सोनवणे, विशाल ढोबळे यांनी ब्लोअर व झुडपांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नात मनोज तळेकर आणि मिलिंद टेमकर हे किरकोळ जखमी झाले. सायंकाळी 7 पर्यंत आग नियंत्रणात आणण्यात आली.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाटसरूंनी सिगारेट, बिडी पिताना काळजी घ्यावी. तसेच संबंधित गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनी वणवे लागणार नाही, यासाठी दक्ष राहावे.
– स्मिता राजहंस,
वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर.

