पिंपरी : अखेर जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित

पिंपरी : अखेर जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित

पिंपरी : आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी शहराला देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाणी उपलब्ध होऊनही केवळ उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने नागरिक अतिरिक्त पाण्यापासून वंचित होते. अखेर, उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. केंद्राचे उद्घाटन येत्या सोमवारी (दि. 28) केले जाणार आहे. त्यानंतर शहराला दररोज केवळ 40 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. आंद्रा व भामा आसखेड धरणातून अनुक्रमे 100 व 167 एमएलडी पाणी महापालिकेस मिळणार आहे. ती जल योजना पूर्ण होण्यास किमान तीन ते पाच वर्षे लागणार आहेत. शहराची तातडीची गरज म्हणून इंद्रायणी नदीवरील तळवडेजवळील निघोजे बंधारा येथून इंद्रायणी नदीतून 100 एमएलडी पाणी उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात आले आहे.

उद्घाटन न झाल्याने तेथून प्रशासनाने पाणीपुरवठा केला नाही. मात्र, प्रशासनाकडून पाण्याची चाचणी सुरू असल्याचे कारण देण्यात आले. अखेर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी या केंद्राचे व निघोचे अशुद्ध जलउपसा केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पालिकेचे सोमवारी अनेक कार्यक्रम

पालिकेचे सोमवारी (दि. 28) विविध कार्यक्रम आहेत. टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या 7 शिल्पांचे अनावरण, सायन्स पार्कच्या आवारातील तारांगण, मोशी येथील अग्निशमन दलाच्या उपकेंद्र, आकुर्डी, प्राधिकरणातील नाट्यगृह, जिजाऊ क्लिनिक, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र आदींचे उद्घाटन केले जाणार आहे. त्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात संबंधित अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या.

शिल्पांवरील कापड महिन्यांनंतर हटणार

टाकाऊ वस्तू व साहित्यांपासून पालिकेने आकर्षक शिल्पे तयार करून विविध 15 चौकांत लावली होती. त्याचे अनावरण तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 11 जूनला करण्यात येणार होते. मात्र, तो पवार यांच्या दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून ते शिल्प कापडात झाकून ठेवण्यात आली आहे. त्यावर धूळ व माती साचल्याने चौक विद्रुप झाले होते. त्याबाबत 'पुढारी'ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे शिल्प पाच महिन्यांनंतर खुली होणार आहेत.

विद्युत रोहितवर दीड कोटीचा खर्च

केवळ उद्घाटनासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी घाईघाईत केंद्राच्या मार्गावरील विद्युत रोहित व खांब हटविण्यात आले. त्यावर तब्बल दीड कोटीचा खर्च करण्यात आला.

तात्पुरता वीजजोड असल्याने एका पंपांवरच काम

चिखली जलशुद्धीकरण केंद्र बांधून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मुदतीनंतर केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा व विद्युत विभागास वीजजोड घेतला नसल्याचा 'साक्षात्कार' झाला. त्यानंतर घाईघाईत विद्युत विभागाने निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले. त्या कामांची मुदत 8 महिने इतकी आहे. त्यापूर्वी पाणी मिळावे म्हणून पालिकेने तात्पुरता वीजजोड घेतला आहे. त्यावर एकच पंप चालत असल्याने शहरवासीयांच्या नशिबी 100 ऐवजी 40 एमएलडी पाणी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news