अखेर पुणे स्थानकावरील लिफ्टसाठी चार जागा निश्चित..!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने लिफ्टसाठी अखेर चार जागांची निश्चिती केली असून, येथील प्लॅटफॉर्म क्र. 1, 2/3, 4/5 आणि मेट्रो स्थानकाशेजारी (प्लॅटफॉर्म क्र. 6) येथे लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणार्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. येत्या सहा महिन्यांत पुणे रेल्वे स्थानकावरील लिफ्ट प्रशासनाकडून बसविण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक असलेला निधी रेल्वे बोर्डाकडून पुणे विभागाला प्राप्त झाला आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर जागा निश्चित करण्यासाठी रेल्वे अधिकार्यांकडून पुणे रेल्वे स्थानकावर पाहणी करण्यात आली. त्या वेळी एकच जागा अधिकार्यांनी निश्चित केली होती. इतर जागा त्या वेळी त्यांना तंत्रिक कारणामुळे निश्चित करता येत नव्हत्या. अखेर बुधवारी पुणे रेल्वे स्थानकावर चार जागा निश्चित करण्यात प्रशासनाला यश आले. त्यानुसार आता लिफ्ट बसविल्या जातील.
लिफ्ट बसविण्याचे काम तातडीने करा
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकावर लिफ्ट बसविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र, या कामात होणार्या दिरंगाईमुळे रेल्वे प्रवासी नाराज झाले आहेत. प्रशासनाने आता दिरंगाई न करता येथील लिफ्ट बसविण्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
तात्पुरता या लिफ्टचा वापर करा
पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून 6 वर जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे सरकते जिने, रॅम्प, बॅटरीवरील गाड्यांची व्यवस्था केली आहे. यासोबतच स्टेशनमास्तरांच्या दालनात प्रवाशांसाठी 14 व्हीलचेअर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या सुविधांचा रेल्वे प्रवाशांनी वापर करावा.
पुणे रेल्वे स्थानकावर लिफ्ट बसविण्यासाठी चार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोन/तीन, चार/पाच आणि सहाजवळ अशा चार जागा निश्चित केल्या आहेत. लवकरच या ठिकाणी लिफ्ट बसविण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल.
– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे पुणे विभाग
हेही वाचा