

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडल्यानंतर नव्या पुलाला मान्यता देण्याची सुरू झालेली प्रक्रिया तब्बल दोन वर्षे लालफितीत अडकली आणि आता कुठे या आठवड्यात काम सुरू होणार आहे. या कामाला आणखी दोन वर्षे लागणार असल्याने पुणेकरांची एकूण चार वर्षे वाहतूक कोंडीची, बहुमूल्य वेळ खर्ची घालणारी आणि असह्य प्रदूषणाची ठरणार आहेत.
विद्यापीठ चौकात मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाण पूल बांधण्यात येईल. सर्वात वरील बाजूने हिंडवडीकडून येणारी मेट्रो बाणेर मार्गे शिवाजीनगरकडे धावेल. त्याखाली पहिल्या मजल्यावर गणेशखिंड रस्त्यावरील सहा पदरी उड्डाण पूल असेल.
तेथून पुलाच्या बाणेरकडे चार लेन, तर औंध व पाषाणकडे प्रत्येकी दोन लेन असून, तेथे रॅम्प बांधण्यात येतील. उड्डाण पुलाच्या बांधकामानंतर चौकातील वाहतुकीची कोंडी बहुतांश प्रमाणात सुटलेली असेल. पुलाखालील बाजूला रस्त्यावरून वळण्यासाठी सुविधा असेल, तसेच भुयारी मार्गातून वाहने जाण्याची सोय करण्यात येणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2020 मध्ये मेट्रोच्या नियोजनाचा आढावा घेताना विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडून टाकण्याचे आदेश दिले.
तेथे मेट्रो व नवीन उड्डाण पूल एकत्र बांधण्याची सूचना त्यांनी केली. कोरोना साथीमधील लॉकडाऊनच्या काळात 14 जुलै ते दहा ऑगस्ट 2020 दरम्यान येथील पूल जमीनदोस्त करण्यात आला. मात्र नवीन पुलाचे नियोजनच झाले नाही. खर्च कोणी करावयाचा यावरून वाद रंगला. तेव्हापासून या चौकातील वाहतूक कोंडी वाढतच चालली होती. दहा-पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी या गर्दीमुळे तास-दीड तास लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची आज बैठक
स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नागरिकांच्या या तक्रारी पीएमआरडीएसोबत बैठक घेऊन मांडल्या. विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी मांडून या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधले. 25ऑगस्टला झालेल्या या चर्चेला उत्तर देताना कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोळे यांच्यासमवेत प्रशासकीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्या लक्षवेधी सूचनेला अनुसरून पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुम्टा) बैठक उद्या गुरुवारी होणार आहे. त्या वेळी पुलाचे बांधकाम सुरू करताना वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी प्राधिकरणाने केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
जानेवारी 2025 ला वाहतूक लागणार मार्गी
मेट्रोसोबत उड्डाण पुलाचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. पुलासाठी पाया घेण्याचे काम येत्या आठवड्यात हाती घेण्यात येईल. दिवाळीनंतर खांब उभारणीच्या कामाला सुरूवात होणार असून, जानेवारीत मेट्रोसाठीचे खांब बांधण्यास प्रारंभ होईल. पुलाचे सर्व काम होण्यास डिसेंबर 2024 उजाडणार आहे. जानेवारी 2025 मध्ये या उड्डाण पुलावरून वाहतुकीला प्रारंभ करण्यात येईल, असे सध्याचे नियोजन आहे. मेट्रो प्रकल्पासमवेतच या पुलाचे काम होणार आहे. त्याऐवजी या उड्डाण पुलाचे काम प्राधान्याने करून तो लवकर सुरू केल्यास या चौकातील व आजूबाजूच्या रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीची समस्या लवकर सुटू शकेल.
पुणे विद्यापीठ चौकात वाहनचालकांना रोज मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने, त्यांच्या तक्रारी मी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडल्या. त्यापूर्वीही वेगवेगळ्या पातळ्यांवर या प्रश्नासाठी मी आवाज उठविला. आधीच दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. युद्धपातळीवर दीड वर्षात हा दुहेरी उड्डाण पूल उभा करावा. दरम्यानच्या काळात वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते व सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी मी केली आहे.
– सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर
पुलाची वैशिष्ट्ये
प्रकल्पाचा खर्च 277 कोटी रुपये
दुमजली उड्डाण पुलाची लांबी 881 मीटर (6 लेन)
औंध बाजूचा रॅम्प 260 मी (2 लेन)
बाणेर बाजूचा रॅम्प 140 मी (4 लेन)
पाषाण बाजूचा रॅम्प 135 मी (2 लेन)
गणेशखिंड रस्ता बाजूचा रॅम्प 130 मी (2 लेन)
उड्डाण पुलाच्या बांधकामाचे नियोजन
कामाचे स्वरूप प्रारंभ पूर्ण
खांबासाठी पाया सप्टेंबर 2022 ऑक्टोबर 2023
उड्डाण पुलापर्यंत खांब नोव्हेंबर 22 नोव्हेंबर 23
मेट्रोपर्यंत खांब जानेवारी 23 डिसेंबर 23
सेगमेंट उभारणी ऑगस्ट 23 एप्रिल 24
गर्डर उभारणी ऑक्टोबर 23 जुलै 24
रॅम्पचे बांधकाम फेब्रुवारी 24 ऑक्टोबर 24
रस्ता व अंतिम कामे मे 2024 नोव्हेंबर 2024