मुकाईवाडी रस्त्याचे खड्डे बुजविणे सुरू; अनेक दिवसांनंतर ग्रामस्थांना मिळणार दिलासा

मुकाईवाडी रस्त्याचे खड्डे बुजविणे सुरू; अनेक दिवसांनंतर ग्रामस्थांना मिळणार दिलासा

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा : जीवघेण्या खड्ड्यांमुळे पिरंगुट येथील मुकाईवाडी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, अशी बातमी दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध होताच ठेकेदाराला जाग आली आहे. उरवडे गावाकडून येणार्‍या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. दैनिक पुढारीतील वृत्तामुळे ग्रामस्थांना अनेक दिवसांनंतर दिलासा मिळणार आहे. बोतरवाडी ते मुकाई वाडी आणि मुकाईवाडी ते पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरील सर्वच्या सर्व खड्डे ठेकेदाराकडून बुजविण्यात येणार आहेत.

परिणामी स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच ठेकेदाराने त्या ठिकाणी खडी डांबर आणून टाकले आणि गेले तीन दिवसांपासून हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. म्हसोबा मंदिर ते बोतरवाडीपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेचार कोटी खर्च करून हा रस्ता तयार केला आहे. मुकाईवाडीकडे जाताना घाट उतार संपला की लगेचच प्रचंड मोठे खड्डे या रस्त्याला पडलेले होते. बोतरवाडीच्या फाट्यापर्यंत पूर्ण रस्त्याची चाळण झालेली होती.

मुकाईवाडीजवळील ओढ्यात तर रस्त्यावर पाणी साठवून अनेक मोठमोठे खड्डे पडलेले होते. लवासा आणि मुठा खोर्‍याकडे जाण्यासाठी शॉर्टकट असल्यामुळे या रस्त्यावरून शनिवार आणि रविवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्यामध्ये टाकलेली खडी बाहेर आलेली होती. ती पूर्णपणे बाजूला करून तसेच तो खड्डा व्यवस्थित स्वच्छ करून त्यामध्ये डांबर टाकून आता सध्या खड्डे भरण्यात येत आहेत. तसेच पुन्हा खड्डे होऊ नये म्हणून किंवा त्यातील खडी डांबर बाहेर पडू नये म्हणून त्याच्यावर लगेच रोलर फिरविला जात आहे.

काही ठिकाणी अरुंद रस्त्याची समस्या
मुकाईवाडी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी सगळीकडूनच हाल होत होते. मुकाईवाडीला जाण्यासाठी पिरंगुट घाटाकडून असलेल्या रस्तावरील खड्डे बुजवत असले तरी पिरंगुट गावातून येणार्‍या रस्त्यावरील खड्डे तसेच असून त्याची अत्यंत कमी रुंदी हा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. उरवडे गावातून येणारा रस्ता असे तीन रस्ते या ठिकाणी येतात, परंतु तीनही रस्ते चांगले नसल्यामुळे येथे येण्यासाठी ग्रामस्थांना खड्ड्यांचा त्रास सहन करूनच यावे लागत होते. पिरंगुट गावांमधून येणार्‍या रस्त्यानेच मुकाईवाडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयामध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना कसरत करत यावे लागते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news