धनकवडी: नवले पूल ते कात्रज यादरम्यानच्या बाह्यवळणावर नुकत्याच झालेल्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव तापकीर यांनी या अपघातांच्या ठिकाणी पाहणी केली. या वेळी त्यांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांबाबत अपयशी ठरत असलेल्या प्रशासनावर ताशेरे ओढले तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
माजी नगरसेवक हरिदास चरवड, बाळासाहेब नवले, सचिन मोरे, गणेश वरपे, सारंग नवले, महेश भोसले यांच्यासह परिसरातील नागरिक या वेळी उपस्थित होते. तापकीर म्हणाले की, नवले पूल ते कात्रज यादरम्यान सुरू असलेल्या कामात ठेकेदार मनमानी करीत असून, वारंवार त्याला मुदतवाढ दिली जात आहे. (latest pune news)
या कामाकडे संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष होत झाल्याचे निदर्शनास आले आहे. ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत आहेत. याशिवाय संबंधित विभागाने महापालिकेकडून या मार्गासाठी ड्रेनेजव्यवस्थेच्या प्राप्त निधीतून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.
संबंधित ठेकेदार आणि अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याबाबत तापकीर यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीसि निरीक्षक दिलीप दाईगडे यांना सूचना केली.
रस्ते सुरक्षा विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी वेळेत झाली असती, तर अपघातांच्या घटना टाळता आल्या असत्या. ही केवळ अपघातांची मालिका नाही, तर रस्ते विकासातील बेफिकिरी आहे.
- भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला