

पुणे : जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी निवडणूक चिन्हांची यादी जाहीर केली आहे. या निवडणूक चिन्हांच्या यादीत आयोगाने भाजीमंडईच भरवली असून, तब्बल 9 फळभाज्या, सात फळांसह जेवणाची थाळीदेखील वाढली आहे. आता ही चिन्हे घेऊन कोण-कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 20 ऑक्टोबर अखेरची मुदत आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांना निवडणूक चिन्हवाटप करण्यात येते. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र चिन्हवाटप करावे लागते. निवडणूक लढविणार्या उमेदवारांची संख्यादेखील मोठी असते.
यामुळेच आयोगाने तब्बल 190 निवडणूक चिन्ह असलेली यादी जाहीर केली आहे. यामध्ये आयोगाने फ्लॉवर, आले, हिरवी मिरची, भेंडी, मका, भुईमूग. वाटाणा, ढोबळी मिरची या फळभाज्या व सफरचंद, नारळ, द्राक्ष, फणस, पेर, अननस, अक्रोड, कलिंगड या फळांचा निवडणूक चिन्ह म्हणून समावेश केला आहे. याशिवाय या सर्व भाज्यांनी संपन्न अशी जेवणाची थाळी हेदेखील निवडणुकीचे चिन्ह म्हणून वापर केला आहे.
निवडणुकीत निवडणूक चिन्हांना खूप महत्त्व असते. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसल्याने प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र चिन्ह द्यावे लागते. त्यात उमेदवारांची संख्यादेखील मोठी असते. पूर्वी बैलगाडी, खोरे, टिकाव, अशा शेती अवजारांचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर केला जात होता. आता 21 व्या शतकाचा विचार करून ही निवडणूक चिन्हे हद्दपार झाली असून, संगणक, पेनड्राइव्ह, हेडफोन, फ्रीज, ओव्हन अशी आधुनिक साधने निवडणूक चिन्हे म्हणून पुढे आली आहेत. त्यात आता भाजी मंडईची भर पडली आहे.
हेही वाचा