सोनोरीतील अंजीर उत्पादक अडचणीत : पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

सोनोरीतील अंजीर उत्पादक अडचणीत : पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पैसे भरूनदेखील जानेवारी महिन्यापासून मिळाले नाही. शेतकर्‍यांनी जानेवारी महिन्यापासून संबंधित अधिकार्‍याला पैसे दिलेले आहेत. परंतु अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे सोनोरी परिसरातील अंजीरबागा जळाल्या आहेत. परिणामी येथील शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, पाणी न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत, असा इशारा माजी सरपंच रामदास काळे यांनी दिला पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा सध्या बोजवारा उडाला आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना देखील वापरावयाच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, यामुळे सोनोरी येथील शेतकरी हताश झाले आहेत.

सोनोरी गावातील अंजीर शेतकर्‍यावर आत्महत्येची वेळ आली आहे. गावातील श्री भैरवनाथ ग्रामविकास पाणीपुरवठा संस्था 40 शेतकर्‍यांनी स्थापन केली, यातून 1 कोटी 75 लाख रुपये खर्चून 5 किलोमीटर पुरंदर उपसा पंप नं. 6 वरून पाइपलाइन केलेली आहे. दरम्यान दि. 20 जानेवारीला 130 तासांचे पैसे पुरंदर उपसा शाखा अभियंता, वितरण नीलेश लगड यांना देऊनही आजतागायत आम्हाला पाणी मिळाले नाही, तसेच संबंधित अधिकारी फोनदेखील उचलत नाही. परिणामी अंजीर, सीताफळ आणि पेरू बागा जळून जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालवे. येणार्‍या 8 दिवसांत आम्हाला पाणी न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी येणार्‍या निवडणुकावर बहिष्कार घालणार आहोत, असे श्री भैरवनाथ ग्रामविकास पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष संजय काळे
यांनी सांगितले.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर अंजीर, सीताफळ, पेरू फळबागा व इतर पिके अवलंबून आहेत. पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नाही. पैसे भरण्यासाठी शासनाची ऑनलाइन प्रणाली असताना ठेकेदार रोख रक्कम मागत असून रकमेची पावती दिली जात नाही. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

– संतोष काळे, सरपंच, सोनोरी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news