

खोर : शेतीत मेहनत, तंत्रज्ञान व जैविक पद्धतींचा संगम झाला, तर शेतीतून आपण बघितलेली स्वप्ने देखील पूर्ण होऊ शकतात, हे दाखवून दिले आहे दौंड तालुक्यातील तानाजी डोंबे व त्यांच्या कुटुंबाने. गेल्या वर्षी साडेचार एकरात घेतलेल्या 1 हजार 200 अंजीर झाडांमधून तब्बल 31 लाखांचे उत्पादन झाले असून, खर्च वजा करता 27 लाखांचा निव्वळ नफा त्यांनी मिळविला आहे. पुणे बाजारपेठेत 90 ते 100 रुपये किलो दराने आणि व्यापारीवर्गाने जागेवर 80 ते 110 रुपये दराने अंजीर विक्री केली आहे. यावर्षी देखील या फळबागा खट्टा बहाराच्या हंगामासाठी सज्ज झाल्या आहेत. (Pune Latest News)
शेतकरी तानाजी डोंबे यांनी अंजीर शेतीत अझोटाबॅक्टर, केएमबी, पीएसबी, रयाजोबियम, बिवेरिया मेटालाक्जिन यांसारख्या जैविक खतांसह गांडूळ खत, पाचाट आच्छादन, घरी तयार केलेले जिवामृत यांचा प्रभावी वापर केला गेला. त्यामुळे पांढर्या मुळ्यांची वाढ जास्त प्रमाणात झाली असून, फळांचा आकार व चमक सुधारली तसेच फळांची टिकवणक्षमता वाढली. रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाली. परिणामी स्वादिष्ट, गोड व रुचकर अंजीर बाजारात लोकप्रिय झाले आहेत.
तानाजी डोंबे यांच्या या यशात भाऊ धनंजय, वडील शांताराम तसेच रेश्मा व सोनाली डोंबे यांचा हातभार आहे. कृषी अधिकारी शिवाजी चांदगुडे, गणेश कदम, आत्मा विभागाचे महेश रूपनवर व सतीश जगताप, समीर डोंबे, अंकुश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर डोंबे कुटुंबाने साडेतीन एकरात 1 हजार 250 डाळिंब झाडांची लागवड करून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
लवकरच ’माऊली ऑरगॅनिक फिग’ या ब्रँड नावाने अंजीर बाजारपेठेत दाखल होणार आहे. जैविक पद्धतींनी उगविलेले, औषधी गुणधर्मांनी समृद्ध आणि गोडसर चवीचे अंजीर ग्राहकांपर्यंत थेट पोहचणार आहेत.