

पुणे : शासनाच्या व पालिकेच्या विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणार्या समाजसेवक पदाच्या 15 जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. पालिकेच्या सामाजिक विकास विभागामार्फत साठहून अधिक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. तसेच, या विभागाला केंद्र सरकारची पीए स्वनिधी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनांची अंमलबजावणी करावी लागते.
या योजनांचा लाभ हा समाजातील सर्वांत खालच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी समाजसेवक हा महत्त्वाचा कर्मचारी असतो. महापालिकेच्या आकृतिबंधा नुसार या पदाच्या 20 जागा मंजूर असून, सध्या केवळ 5 समाजसेवक कार्यरत आहेत. त्यांंना परिमंडळानुसार जबाबदारी देण्यात आली आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या योजनांच्या कामांना गती मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक समाजसेवक नियुक्त करणे आवश्यक असताना सध्या एकाच समाज सेवकाकडे तीन क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्र दिले आहे. अनेक योजना राबविण्याची जबाबदारी असल्याने कामाचा ताणही वाढत आहे.
पालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे. सध्या प्रशासना कडून नोकर भरती सुरू आहे. यासाठी आमच्या विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
– आर. आर. चव्हाण, मुख्य समाज विकास
अधिकारी, महापालिका