

पिंपळे गुरव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: एकीकडे पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीअंतर्गत गतिमान होत आहे. असे असूनही उपनगरातील ग्रामस्थ मात्र, मूळ परंपरागत सण आणि उत्सव प्रथा जपत ग्रामसंस्कृतीच्या पाऊलखुणा जपल्याचे सकारात्मक चित्र सध्या उपनगरातील गावांमधून दिसून येत आहे.
सध्या उपनगरातील सांगवी, पिंपळे गुरव आणि दापोडी या गावांमध्ये आजतागायत गावचे सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होताना दिसतात. अजूनही गावच्या संस्कृतीची कास तरुण वर्गदेखील धरून आहे. सांगवीतील ग्रामदैवत वेताळ महाराज उत्सव परंपरागत पद्धतीने अजूनही राम नवमीला केला जातो. गावच्या ग्रामदैवत दर्शनाला सांगवीकर आवर्जून उपस्थिती लावतात. गावातले उत्सव सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन साजरे करतात. त्यातून एकी टिकून गावच्या प्रथा, परंपरा पाळल्या जातात. एकूणच काय गावाची एकसंधता बांधली जाते, असा येथील गावकर्यांचा विश्वास आहे.
पिंपळे गुरव येथील भैरवनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा लग्न सोहळ्यानिमित्त गावाची पालखी मिरवणूक, बगाड आणि नंतर उरूस म्हणजे जत्रा गावठाणात भरवली जाते. यात गावकरी उत्साहाने सहभागी होतात.
दापोडीतील महावीर जयंती दिवशी ग्रामदैवत फिरंगाई देवीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. उत्सवानिमित्त देवीचा पालखी सोहळा,छबीना पारंपरिक कार्यक्रम होतात. कुस्त्यांची स्पर्धा, बाल जत्रा, नाटक, कला गुणांचे कार्यक्रम गावात भरवले जातात. यात प्रत्येक गावकरी आनंदाने सहभागी होतो. उरूसनिमित्ताने गाठी-भेटी होतात. उत्सवानिमित्ताने भरणार्या उरूसामध्ये बच्चे कंपनी मनसोक्त आनंद घेतात.
गावच्या परंपरागत सण, उत्सव पूर्वीपेक्षा आज मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. पूर्वी कमी लोक वर्गणीतून स्थानिक उत्सव साजरा करायचे पण आता एक, दोन लाख रुपये वर्गणीतून गावचे उत्सव साजरे केले जातात.यातून सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने एकत्र येतात.
-प्रकाश तुकाराम काटे, ज्येष्ठ नागरिक, दापोडी गावआजही गावचे उरूस आकर्षण आहे. गावातील प्रत्येक नागरिक ग्रामदैवताच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात. अजूनही गावात येणारे बाहेरील नागरिकदेखील प्रथा, उत्सवात सहभागी होत गावच्या परंपरा जपतात.
– किसन फसके, स्थानिक नागरिक, सांगवी गाव