Pune Traffic Update:
पुणे: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ते 29 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातून मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर-आळेफाटा-ओतूर- बनकरफाटामार्गे किल्ले शिवनेरी येथे पोहचणार आहे. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरून नारायणगावड्ढमंचर-खेड-चाकण-तळेगाव-लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार आहे.
मोर्चा मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 27 ते 29 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात विविध मार्गांवरील वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे. (Latest Pune News)
नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक : जांबुत फाटा (क्र. 14) येथून नगरकडे जाणारी वाहने बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगरमार्गे जातील.
नारायणगाव-जुन्नर मार्गावरील वाहतूक : ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुकमार्गे वळविण्यात आली आहे.
नारायणगाव-पुणे वाहतूक : पुणे-नाशिक महामार्ग (क्र. 50) व बायपासमार्गे कार फाटा-मंजूर पोलिस स्टेशन-नागापूर-रोडेवाडी फाटा-लोणी-पाबळमार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे पुण्याकडे जाणार आहे.
नारायणगाव-मंचर मार्गावरील वाहतूक : बायपास क्र. 60 मार्गे निघोटवाडी सरळमार्गे जाताना जीवनखिंड-मंचर शहर-अवसरी फाटा-नंदी चौकमार्गे वळविली जाईल.
खेड-पुणे वाहतूक : पाबळमार्गे वळविण्यात येईल.
मुंबई-पुणे महामार्ग (क्र. 48) : येथील वाहतूक द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली असून, चाकण-देहूरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहने वडगाव फाटा-उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे जातील.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक : मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवण एक्झिटमार्गे लोणावळा शहरात न वळता थेट मुंबईकडे जातील. त्याचप्रमाणे जुन्या महामार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहने खंडाळा-वलवण एक्झिटमार्गे लोणावळा शहरात न वळविता थेट पुण्याकडे जातील.
लोणावळा शहर परिसरातील वाहतूक : येथून पुणे व मुंबईकडे जाणारी सर्व वाहने जुन्या महामार्गाऐवजी वलवण पुलावरून द्रुतगती मार्गाने प्रवास करतील.
हे आदेश 27 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 29 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील.