पिंपरी : मोबाईल अन् खेळांमध्येही ढिश्याँव.. ढिश्याँव..!

पिंपरी : मोबाईल अन् खेळांमध्येही ढिश्याँव.. ढिश्याँव..!
Published on: 
Updated on: 

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : मैदानी खेळाची आवड, चांगले संस्कार याऐवजी आता लहान मुलांच्या हातात मोबाईल आले असून, दिवसभर मुले या मोबाईलमध्ये गुंतून राहत आहेत. मोबाईलमधील व्हिडिओ गेम्स खेळताना दिसून येत आहेत. त्यातून मुलांमध्ये आक्रमकता वाढत आहे. या अनुकरणप्रियतेतून भविष्यात ही मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे भय मानसोपचार तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. पूर्वी मुले मैदानी खेळ खेळत. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ होत होती. आजीकडून सांगितल्या जाणार्‍या छान छान गोष्टी, रामायण, महाभारत कथासार यामधून बालमनावर चांगले संस्कार होत होते; मात्र कालानुरूप सारे बदलत असून लहान मुलांच्या हातात खेळण्याच्या बंदुका दिसू लागल्या आहेत. लहान मुलांच्या मनावर पटकन एखादी गोष्ट कोरली जाते. त्यांच्यात अनुकरणप्रियता असते. त्यामुळे एका विषयापलीकडे जाऊन ते विचार करत नाहीत.

दिसण्यापलीकडे एक जग असते. याचे भान त्यांना राहत नाही. त्यातून मुले आक्रमक बनत आहेत. आक्रमकता ही सामान्य गोष्ट वाटू लागल्याने त्यांच्यात हिंस प्रवृत्ती वाढत आहे. यातून ही मुले भविष्यकाळात गुन्हेगारीकडे वळू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये बालगुन्हेगारीत झालेली वाढ ही अशा चुकीच्या संस्कारांचा परिणाम आहे. लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. लहानपणीच त्यांचे आयडॉल तयार होतात. हे आयडॉल शिक्षक, पालक यांच्या शिकवणीतून व समाजाच्या एकंदरीत अनुकरणातून तयार होतात. मात्र मोबाईल आणि खेळांमध्येही ढिश्याँव.. ढिश्याँव.. हे चित्र दिसत असल्याने ही मुले बालगुन्हेगारीकडे वळत आहेत.

मोबाईलवरील वास्तवाशी संबंध नसलेल्या व्हिडिओ गेम्स तसेच बंदुकीचे खेळ हे लहान मुलांसाठी निश्चितच योग्य नाही. त्यामुळे मुलांवर मुलांच्या स्वभावात चिडचिडेपणा, आक्रमकता वाढत आहे. अशावेळी पालकांवर मोठी जबाबदारी आहे. नवनवीन गोष्टींचा स्वीकार करत असताना पालक म्हणून मुलांच्या मोबाईल वापरावर वेळेचे बंधन आणणे, विशिष्ट वेळे पुरताच तसेच गरजेपुरताच मोबाईल आपल्या पाल्यांना देणे अपेक्षित आहे. त्याबरोबरच मोबाईलमधील या मारधाड खेळाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. मोबाईलमधील खेळाकडे फक्त मनोरंजन या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे बालमनावर बिंबविण्याची गरज आहे.अन्यथा मुले बाल गुन्हेगारीकडे वळू शकतात.
                                              – डॉ. धनंजय अस्तुरकर, मानसोपचार तज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.