पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'ससून रुग्णालयात मोजके अधिकारी आणि कर्मचार्यांच्या गैरवर्तनामुळे सगळयाच डॉक्टरांवर संशयाची सुई फिरत आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करत असलो, तरी उद्या काय घडेल आणि हॉस्पिटल पुन्हा कशामुळे चर्चेत येईल, अशी कायम भीती वाटत राहते…' अशा भावना ससूनमधील शल्यचिकित्सा विभागातील एका डॉक्टरने व्यक्त केल्या आहेत. ससूनमध्ये अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचार्यांमध्ये 'भय इथले संपत नाही' अशी भावना निर्माण झाली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्येही सध्या हीच चर्चा ऐकायला मिळत आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालय गेल्या काही काळापासून वादाच्या भोवर्यात अडकले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, औषध खरेदी आणि निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार, ललित पाटीलसह अनेक कैद्यांना मिळणारा आश्रय, कर्मचारी आणि डॉक्टरांकडून पैशांची मागणी अशा अनेक घटनांमुळे रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. मात्र, मोजके डॉक्टर, कर्मचारी आर्थिक गैरप्रकारांमध्ये गुंतले असले, तरी प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणारे बरेच कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात कार्यरत आहेत. आपले काम निष्ठेने करणारे डॉक्टर, नर्स यांना ससूनची प्रतिमा मलीन होत असल्याची खंत वाटत असल्याचे त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
ससून सर्वोपचार रुग्णालयात 30 हून अधिक विभाग कार्यरत आहेत. बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज 2000 हून अधिक रुग्ण उपचारांसाठी येतात. तर, आंतररुग्ण विभागामध्ये एक ते दीड हजार रुग्ण दाखल असतात. रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये अनेक सुधारणा गरजेच्या आहेत. मात्र, रुग्णसेवेला दुय्यम महत्त्व मिळत आहे. त्यामुळे ससूनकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. खासगी रुग्णालयांत उपचार परवडत नाहीत आणि ससूनसारख्या रुग्णालयाबद्दल विश्वास वाटत नाही, असा सर्वसामान्य माणूस कात्रीत सापडला आहे.
ससूनमध्येच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि इथेच डॉक्टर म्हणून रुजू झालो. मात्र, आता कुटुंबीय ससूनमधून बाहेर पड आणि एखाद्या खासगी रुग्णालयात रुजू हो किंवा स्वत:चा दवाखाना सुरू कर, यासाठी आग्रह करत आहेत. बाहेर नोकरी करणे परवडेल, असेच वाटू लागले आहे, अशी माहिती एका डॉक्टरने दिली.
मी ससूनमध्ये गेल्या 25 वर्षांपासून काम करते. रुग्णालयाने इतक्या वर्षांमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, रुग्णालयाबद्दल एवढी वाईट स्थिती कधीच पाहिली नाही. चार-पाच वर्षांमध्ये मी निवृत्त होईन. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे पूर्वीसारखे कामात मन रमेनासे झाले आहे. नर्स, वॉर्ड बॉय यांच्यामध्येही सध्या केवळ गैरप्रकारांचीच चर्चा आहे. कधी आणि कोणत्या पद्धतीने अचानक ससूनचे नाव बदनाम होईल, अशी भीती वाटत राहते.
– ससूनमधील परिचारिका
हेही वाचा