

पारगाव( ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पूर्वभागात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या भागात ऊसतोड जोरात सुरू असल्याने बिबट्यांचा अधिवास संपला आहे. येथे उसाचे क्षेत्र अधिक असल्यामुळे वाडीवस्ती, मळ्यांमधील शाळा, अंगणवाड्यांमध्ये मुलांना उसाच्या शेतांमधूनच जीव मुठीत धरून ये – जा करावी लागते. यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण दिसत आहे.
तालुक्याच्या पूर्वभागातील पारगाव, शिंगवे, वळती, नागापूर, थोरांदळे, रांजणी, जाधववाडी आदी गावे ही बिबट्याप्रवण क्षेत्रात येतात. या गावांमध्ये सर्वाधिक क्षेत्र उसाचेच आहे. सध्या ऊसतोड जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी, ऊसतोड कामगारांना बिबट्यांचे वारंवार दर्शन होत आहे, तसेच शेतकरी, मेंढपाळांकडील शेळ्या – मेंढ्या, कुत्री, गायी या पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत.
त्यामुळे शेतकरी, मेंढपाळांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ऊसतोडीमुळे बिबट्यांचा अधिवास संपल्याने त्यांना लपण जागा राहिलेल्या नाहीत. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. सकाळ, संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पालकांना शाळेत जाऊन मुलांना आणावे लागते.
आमच्या परिसरात भोर – शिंदे, बेनके, जाधव मळ्यातील शाळकरी मुलांना भोकरवस्तीमधील शाळा, अंगणवाडीत जावे लागते. शाळेत जाणार्या रस्त्यावर दुतर्फा उसाचे क्षेत्र आहे. येथे बिबट्यांचा वावर अधिक आहे. पाळीव जनावरांवर बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुले शाळेत जायला घाबरत आहेत. आम्हाला स्वतः शेती कामे सोडून मुलांना ने – आण करावी लागत आहे.
-संतोष आबू शिंदे, पालक