

पिंपरी : प्रेयसीबाबत अपशब्द वापरल्याने मुलाने बापाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी मुलाच्या आईने आणि भावाने खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. 5) रात्री नऊ वाजता दिघी येथे घडली. अशोक रामदास जाधव (45, रा. समर्थ सदन बिल्डिंग, दिघी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा राहुल अशोक जाधव (25), अनिल अशोक जाधव (23) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही मुलांसह अशोक यांच्या पत्नी विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल जाधव याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, अशोक यांनी अनिल याच्या प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारले. याचा राग आल्याने आरोपी अनिल याने वडील अशोक यांचा दोरीने गळा आवळून खून केला. दरम्यान, अशोक यांच्या नाकातोंडातून आलेले रक्त फरशीवर सांडले होते. आरोपीच्या आईने फरशीवरील सर्व रक्त अशोक यांच्या शर्टाने पुसून काढले. तर, राहुल याने कपडे वाळत घातलेली दोरी फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेतल्याचा बनाव रचल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत