

बारामती: बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरला गाडी धडकून गाडी चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले.
रविवारी (दि. 27) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खंडोबा नगर जवळ वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या डंपरखाली ही दुचाकी चिरडली व अपघात झाला. या घटनेत ओंकार आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर सध्या रा. मोरगाव रोड बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Pune News)
ओंकार यांच्या दुचाकी वर दोन मुली होत्या. यामध्ये चार वर्षाची मधुरा व दहा वर्षाची सई या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र दवाखान्यात उपचारासाठी पोहोचवण्या पूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने संपूर्ण बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.