धनकवडी: धनकवडी पोस्ट ऑफिस चौक ते त्रिमूर्ती चौकादरम्यानच्या रस्त्यावर मोकाट जनावरांनी ठिय्या मारल्याने वाहतुकीस अडथळा झाला. त्यामुळे रस्त्यातच मोकाट जनावरांनी ठाण मांडल्याने वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवावे लागत होते. तसेच, जनावरांच्या बाजूने वळण घेत वाहनचालकांना रस्ता पार करून पुढे जावे लागत होते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
मोकाट जनावरे धनकवडी पोस्ट ऑफिसकडून जाणार्या रस्त्यावर अनंतनगर सोसायटीसमोरील रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने मोकाट जनावरे ताब्यात घेऊन त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (Latest Pune News)
धनकवडी पोस्ट ऑफिस ते भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकाकडे जाणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात रहदारीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी अचानक बसलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांना वेगावर मर्यादा ठेवावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.