मंचर : पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मंचरचे माजी सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष दत्ता गांजाळे उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याने माजी सरपंच दत्ता गांजाळे थेट बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (दि. २२) सकाळी साडेअकरा वाजता जाऊन उपोषणास बसले आहेत.
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार (दि. १८) पासून दत्ता गांजाळे उपोषणाला बसले आहेत. "कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, जलसंपदा विभागाकडून वाढीव पाणीपट्टी वसूल करू नये, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळावी, पिंजऱ्याची संख्या वाढून प्रत्येक गावात जनजागृतीचे कार्यक्रम वनखात्याने आयोजित करावेत, वीज बिल माफी मिळावी, मोजणीची कामे व तहसील कार्यालयातील कामे जलद गतीने व्हावीत या मागण्यासाठी त्यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे". गांजाळे यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. मात्र उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असूनही कोणताही शासकीय, प्रशासकीय अधिकारी त्याच्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आला नाही. त्यामुळे दत्ता गांजाळे हे थेट चांडोली बुद्रूक येथील शेतकऱ्याच्या शेतात बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात जाऊन उपोषणास बसले आहे.
चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे बेलदत्तवाडी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या पकडण्यासाठी आठ दिवसा पूर्वी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र पिंजऱ्यात मेलेल्या कोंबड्या भक्ष म्हणून ठेवण्यात आले असल्याने पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद होत नाहीं, तसेच तिन चार दिवसापूर्वी पिंजऱ्यात येऊन बिबट्या पुन्हा बाहेर गेल्याचे स्थानीक शेतकरी सांगत आहेत. आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेतीला पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळें शासनाने शेतकऱ्याला दिवसा विज द्यावी ही प्रमुख मागणी असून आमच्या मागण्या शेतकरी हितासाठी असून संबंधित विभाग, अधिकारी तसेच सरकारने याची दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याचा वावर आहे, त्या शेतकऱ्यांनी वनविभावाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असता अनेकदा शेतकऱ्याला दुसऱ्या गावात लावलेला पिंजरा स्व:खर्चाने आपल्या शेतात आणावा लागत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवले जाणारे भक्ष शेळी, मेंढी, जिवंत कोंबड्या या देखील स्व:खर्चाने आणाव्या लागत असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहे.
हेही वाचा