

राहू : पुढारी वृत्तसेवा : सध्या रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू आहे. राहू बेट परिसर तसेच यवतच्या पश्चिमपट्ट्यातील शेतकर्यांची गहू मळणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. बोरीऐंदी परिसरात गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर हरियाना, पंजाबमधून हार्वेस्टर दाखल झाली आहेत.
पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता गव्हाची लवकर मळणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसून येत आहे. पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरिता लागणारा वेळ पाहता या हार्वेस्टर मशीनने ते केवळ तासाभरात होऊ लागल्याने यांत्रिकीकरणास शेतकरी पसंती देऊ लागला आहे. हार्वेस्टरमुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीतकमी वेळात पिकांची मळणी करीत आहे.
या मशीनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाली आहे. पारंपरिक पध्दतीने गहू काढावयाचा म्हटला तर एका एकराला दहा ते बारा महिला मजूर व चार हजारांपर्यंत मजुरी लागते. गहू मळणीसाठीची मजुरी वेगळी असते. परंतु, हार्वेस्टर मशीनमुळे एकरी तीन हजार रुपये दर देऊन एक एकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्धा तासात काढून होत आहे. कमी वेळेत काम होत असल्याने हार्वेस्टरला मागणी वाढू लागली आहे. हार्वेस्टरने गहू करून घेतला असून, उताराही समाधानकारक असल्याचे शेतकरी किशोर राजाराम गायकवाड यांनी सांगितले.