रब्बी पिके सुकू लागली ; प्रतीक्षा धोम-बलकवडी आवर्तनाची

रब्बी पिके सुकू लागली ; प्रतीक्षा धोम-बलकवडी आवर्तनाची

भोर : पुढारी वृत्तसेवा : रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे धोम-बलकवडी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. भोरच्या दक्षिण भागातील चाळीसगाव, वीसगाव खोर्‍यातून पूर्वेकडे गेलेल्या धोम-बलकवडी उजवा कालवा मागील दोन-तीन महिन्यांपासून कोरडाठाक पडला आहे. वीसगावच्या नेरे, खानापूर, तर चाळीसगाव खोर्‍यातील आंबवडे परिसरातील शेतकर्‍यांची रब्बी पिके धोम-बलकवडी उजव्या कालव्याच्या आवर्तनावर दरवर्षी अवलंबून असतात; मात्र यंदा रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू, करडई आणि इतर पिके सुरुवातीच्या काळात जोमात आली होती. सध्या मागील 15 दिवसांपासून पिकांना पाण्याची आवश्यकता असतानाही कालव्याला आवर्तन सोडले गेले नसल्याने पिके सुकून चालली आहेत. शेतकरी वर्ग पिकांचे हाल पाहून चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा खरिपातील पिके जोमात येऊन शेतकर्‍यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे. त्याचप्रमाणे रब्बी पिकांना पाणी मिळाले तर रब्बी पिकेही जोमात येऊन उत्पन्नात वाढ होणार असल्याची आशा शेतकर्‍यांना आहे. धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला पहिले आवर्तन सोडले तर रब्बीतील पिकांना फायदा होण्याबरोबरच कालव्याच्या खालील भागातील ओढे-नाले तसेच विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कालव्याचे पहिले आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

वीसगाव, चाळीसगाव खोर्‍यातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज धोम-बलकवडी उजवा कालव्याच्या खात्याकडे करावा. पाणी मागणीनुसार वरिष्ठ कार्यालयाकडे लवकरच माहिती कळविली जाईल. कालवा सल्लागार बैठकीत याचा निर्णय घेऊनच कालव्याला पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाते.
                                                                        स्वप्निल बोरसे, कनिष्ठ अभियंता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news