

वडगाव मावळ : तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी काले कॉलनी यांच्या वतीने आत्मा योजनेंअतर्गत चांदखेड येथे आयोजित शेतीशाळा उपक्रमास महिला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे, कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, कृषी सहायक स्मिता कानडे, आत्मा योजनेचे राहुल घोगरे तसेच शेतीशाळा विद्यार्थिनी महिला शेतकरी उपस्थित होते. शेतीशाळेच्या वर्गाचे आयोजन कृषीमित्र नितीन गायकवाड व कृषी सहायक मनीषा घोडके यांनी केले होते.
यामध्ये शेतीशाळा म्हणजे काय? भातपीक बियाणे निवड, भात बीजप्रक्रिया, गादी वाफ्यावर रोपवाटिका, चारसूत्री भात लागवडीसाठी दोरी तयार करणे, चारसूत्री लागवड व युरिया ब्रिकेटचा वापर, भातपीक परिसंस्था निरीक्षणे, संकल्पना, चित्रीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शेतीशाळा प्रतिज्ञा घेऊन सुरुवात करण्यात आली, त्यानंतर मागील वर्गाचा आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीला भातपीक फुटव्याच्या अवस्थेत आहे. तर, काही ठिकाणी भाताच्या लोंब्या दिसू लागल्या आहेत. भातपिकासाठी आताचा कालावधी हा महत्त्वपूर्ण आहे. कारण सध्या भातपिकावर कीड व रोग येण्यास वातावरण पोषक झाले आहे. आता पडणार्या पावसाने सध्या कीड व रोगाचे प्रमाण कमी आहे.
निबोळी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक त्या अनुषंगाने चांदखेड येथे घेण्यात आलेल्या शेतीशाळा वर्गात दशपर्णी अर्क, निबोळी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच, कीड व रोगासाठी त्याचे महत्त्व व फवारणी, कामगंध सापळे, पक्षीथांबे याबाबत महिला शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सद्यस्थितीला भातावर तुडतुडे, खोडकीडा, पाने गुंडळाणारी आळी या किडी व करपा, कडा करपा हे रोग येऊ शकतात. पावसाची उघडीप, हवेतील आर्द्रता याचे प्रमाण वाढल्यास किडी व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
मनीषा घोडके, कृषी सहायक चांदखेड येथे घेण्यात येत असलेल्या भातपीक शेतीशाळेमध्ये महिला शेतकर्यांनी भातपिकाबाबत सखोल ज्ञान अवगत केले आहे. भात पिकाच्या कीड व रोग ओळखायला लागल्या आहेत. नक्कीच पुढील काळात अनेक महिला शेतकर्यांना त्याचा फायदा होईल. चांदखेड येथील शेतीशाळाचे वर्ग अतिशय उत्कृष्ट पार पडत असून तेथील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
– दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, मावळ