

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : कांद्यांचे घसरलेले बाजारभाव, बराकीतील कांद्यांचे वाढत चाललेले सडण्याचे प्रमाण आणि कांद्यांना फुटलेले कोंब, यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शेतकर्यांनी आता कांदे बाजारपेठेत पाठवण्याची लगबग सुरू केली आहे. पूर्व भागात कांद्याचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. परंतु यंदा कांदा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागला. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या वेळीच कांद्यांना चांगला बाजारभाव होता.
दहा किलोला साडेतीनशे रुपयांपर्यंत बाजारभाव त्यावेळी मिळाला. शेतकर्यांना भावात आणखी वाढ होईल ही अपेक्षा होती, त्यामुळे अनेक शेतकर्यांनी कांदा बराकीतच साठवून ठेवला. परंतु दिवाळीनंतर कांद्याच्या बाजारभावात घसरणच होत गेली. सध्या कांद्याच्या बाजारभावात घसरण होऊन दहा किलोला 120 ते 150 रुपये इतका बाजार भाव मिळत आहे. पिकासाठी गुंतवलेल्या भांडवलाच्या तुलनेत हा दर कमी आहे. बाजारभावातून मजुरी, उत्पादन खर्चही वसूल होणार नाही, त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागात अनेक कांदा बराकींसमोर सडलेल्या कांद्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. यंदा अतिपावसाचा फटका बराकीत साठवलेल्या कांद्यांना बसला. अनेक कांदा बराकींमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. सध्या बराकीत साठवलेल्या कांद्यांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत पाठवूनही या कांद्यांना बाजारभाव चांगला मिळत नाही. शेतकर्यांनी आता मिळेल त्या भावात कांदा विक्री सुरू केली आहे. पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमधील कांदा उत्पादकांनी बराकीतील कांदा बाजारपेठेत पाठवण्याची लगबग सुरू केली आहे.