सांगवीतील शेतकर्‍यांचा पाण्यासाठी टाहो

सांगवीतील शेतकर्‍यांचा पाण्यासाठी टाहो
Published on
Updated on

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : सांगवी (ता. बारामती) परिसरात पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही एकदाही जोरदार पाऊस झाला नाही, तर जलसंपदा विभागाचा नियोजनशून्य कारभार. सध्या या भागातील जलस्रोत कोरडे ठणठणीत पडू लागले आहेत. त्यामुळे उसाच्या उभ्या पिकांची अक्षरशः चिपाडे झाली आहेत, तर दुसरीकडे खरीप हंगामातील कोणतीच पिके घेता आली नसून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहेत. सध्या धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून, पाणीसाठा होत आहे. त्यामुळे निरा डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे.सांगवी भागात एखादा मान्सूनपूर्व मोठा पाऊस होईल ही शेतकर्‍यांना भाबडी आशा होती. परंतु त्याही मान्सूनपूर्व पावसाने या भागाला हुलकावणी दिली.

ऐन पावसाळ्याचा दीड महिना कोरडा गेला. शेतकर्‍यांनी पणदरे जलसंपदा विभागाकडे 12 जून रोजी शेतीला आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्या वेळी शेतीच्या पाण्याचा कोटा संपला असल्याचे सांगण्यात आले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाणी सोडण्याची मागणी केली होती.

त्या वेळी पवार यांनी धरणांमध्ये पाणी नसल्याने अडचण असल्याचे सांगून जेव्हा वीर धरणात 35 टक्के पाणीसाठा झाला की, शेतीसाठी पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. सध्या भाटघर व निरा देवघर धरणांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा झाला आहे आणि वीर धरणात शुक्रवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता 36.79 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पवार यांनी दिलेले शेतीसाठी पाणी सोडण्याचे आश्वासन पाळण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

एकीकडे मुसळधार, तर दुसरीकडे उन्हाचे चटके
एकीकडे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, सांगवी येथे सकाळी कडक उन्हाचा चटका बसत असून, दिवसभर जोरदार वारे वाहत आहे. या भागात मोठा पाऊस न झाल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी दुग्ध व्यवसायसुद्धा अडचणीत आला आहे. जलसंपदा विभागाच्या मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीत शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी शेतीच्या तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news