लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसाच्या आधारावर लोणी धामणी, शिरदाळे, पहाडदरा परिसरातील शेतकरी कोरड्यातच पेरणी करत आहेत. महागाई आणि दुष्काळ यामध्ये शेतकरी अडकला असताना कोरड्यात पेरणी म्हणजे जुगार खेळत असल्याचे धामणी येथील प्रगतिशील शेतकरी आनंदा जाधव यांनी सांगितले.
लोणी धामणी परिसर हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते; परंतु जुलै उजाडला तरी पावसाचा पत्ता नसून, अजून आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर पेरणी केलेले बियाणेही खराब होऊन जाईल, अशी माहिती शिरदाळे उपसरपंच मयूर सरडे, धामणी सरपंच रेश्मा बोर्हाडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी आता पर्यंत 100 टक्के पेरणी झाली होती.तसेच शिरदाळे परिसरात होणारी बटाटा लागवडदेखील पूर्ण झाली होती.
यंदा मात्र पाऊस नसल्याने बटाट्याचे आगार असलेले शिरदाळे येथील शेतकरी चिंतेत आहेत. या वर्षी पावसाचे प्रमाण पाहता, बटाटा लागवड घटण्याची शक्यता आहे. तसेच खतांचे वाढलेले भाव आणि बियाणे हा खर्च देखील परवडणारा नसून, शेतकरी फक्त काही तरी शेतात करायचे म्हणून पीक घेत असतात असे प्रगतिशील शेतकरी बाबाजी चौधरी, निवृत्ती मिंडे, राघू रणपिसे, सुरेश तांबे यांनी सांगितले.
शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट उभे राहील. खतांची आणि बियाणांची किंमत पाहता हे शक्य देखील नसल्याने शेतकर्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
– मयूर सरडे, उपसरपंच शिरदाळे.
हेही वाचा