

पुणे : जिल्ह्याच्या उत्तर भागात सध्या कांदा लागवड आणि बटाटा काढणी सुरू आहे. मात्र, या दोन्ही कामांसाठी मजूरटंचाई जाणवत आहे. परिणामी, शेतकर्यांना जास्त रक्कम देऊन अन्य तालुक्यांतील मजूर आणून कामे करून घ्यावी लागत आहे. याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांमध्ये सध्या बटाटा काढणीची लगबग सुरू आहे. मात्र, मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकर्यांना धावाधाव करावी लागत आहे. दरम्यान, चालू हंगामात बटाट्याचे कमी-अधिक उत्पादन झाल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळेलच, याची शाश्वती नसल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी आदी गावांमध्ये बटाटा काढणीची लगबग सुरू आहे. बटाटा काढण्यासाठी मंजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकर्यांची धावपळ होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हे तालुके बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते. सध्या बटाटा हे पीक परिपक्व झाले आहे. शेतकरी लाकडी नांगर व ट्रॅक्टरच्या साहाय्याचा वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतला जातो. वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. काही शेतकरी शीतगृहात साठवून ठेवत असतात.
परगावाहून आणावे लागतात मजूर
काही किरकोळ, घाऊक व्यापारी काढलेला बटाटा शेतातच विकत घेतात. बटाटा काढण्यासाठी मजुरांची वानवा जाणवत असल्याने जादा पैसे देऊन मजूर परगावाहून वाहनांची व्यवस्था करून आणावे लागत आहेत. त्यामुळे शेतकर्यांची मोठी दमछाक होत आहे. सध्या बटाट्याला दहा किलोमागे 130 ते 150 रुपयांचा भाव मिळत असल्याचे धामणी येथील बटाटा उत्पादक शेतकरी शांताराम जाधव व वसंत सीताराम जाधव यांनी सांगितले.
सध्या बटाटा काढणी सर्व ठिकाणी चालू असल्याने भावात चढउतार होत आहे. बटाटा लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्च येतो. शिवाय बटाट्याला गळीत चांगले निघाले नाही तर शेतकर्यांना आर्थिक फटका बसतो. सध्या काढणीला आलेल्या बटाट्याचे गळीत जमिनीच्या पोतवर अवलंबून असते.
– मोहन जाधव, बटाटा उत्पादक शेतकरी