

मंगेश देशमुख
पुणे: ‘रात्र वैरी झाली गं बाई...’ या ओळी आता फक्त ओव्या नाहीत, तर शिरूर तालुक्यातील शेतकर्यांची हतबलता व्यक्त करणारा अनुभव बनल्या आहेत. सध्या डाळिंबाच्या झाडांवर फळं नाही, तर शेतकर्यांचे अश्रू लागले आहेत.
कारण, या परिसरात डाळिंब चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठं ना कुठं शेतकर्यांच्या मेहनतीवर चोरटे डल्ला मारत आहेत. दौंड, इंदापूर, बारामती आणि जुन्नर या भागात देखील डाळिंब शेती केली जाते. या परिसरात देखील चोरट्यांचे हे लोण पसरण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच पावले उचलण्याची गरज आहे. (Latest Pune News)
शिंदोडी येथे शहाजी वाळुंज यांच्या अडीच एकर बागेतून तब्बल 4.5 लाखांचे डाळिंब चोरले गेले. चोरट्यांनी 4 हजार 500 किलो डाळिंब एका रात्रीत साफ केले. दुसरीकडे मांडवगण फराटा येथील सुभाष जगताप यांच्या चार एकर बागेतील 1 हजार किलो डाळिंब चोरीस गेले. त्यांचे सुमारे 1 लाख 60 हजारांचे नुकसान झाले.
हे सगळं होत असताना, पोलिस यंत्रणा काहीशी सुस्तच वाटते. मोटेवाडीत संदीप येलभर यांच्या सावधपणामुळे चोरीचा एक डाव उधळून लावण्यात यश आलं. यामध्ये चोरट्यांची दुचाकी पकडली गेली असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी केवळ पाहणी न करता ठोस कारवाई करावी. स्थानिक गावगुंड, टोळ्या किंवा बाहेरून येणारे हे टोळके याचा शोध लावून शिक्षा झाली पाहिजे; अन्यथा भविष्यात हे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरण्याची दाट शक्यता आहे.
डाळिंब हे आता सोन्याहून महाग!
डाळिंब हे शेतकर्यांसाठी केवळ पीक नाही, तर गेल्या काही महिन्यांच्या घामाची कमाई आहे. बाजारात सध्या 100 रुपये किलो भाव मिळतोय आणि त्यामुळेच चोरट्यांच्या टोळ्यांनी या फळावर नजर ठेवलेली आहे. हे पीक महागडं, खर्चिक आणि रोगप्रणालीसाठी संवेदनशील असल्याने शेतकर्याला शेवटपर्यंत निगराणी लागते. एकूणच शेतकऱ्यांसाठी डाळिंब आता सोन्याहून महाग झाले आहे, असेच म्हणावे लागेल.
पोलिस यंत्रणेस काही प्रश्न
या घटनांमुळे पोलिस यंत्रणांची कार्यक्षमता तपासली जात आहे. मोटेवाडीत चोरी करणाऱ्याची दुचाकी मिळाली, चोरीची फळेही सापडली, पण चोरटे कोठे आहेत? पोलिसांच्या तपासाला वेग येईल का? की पुन्हा एखादा शेतकरी रात्री तीन वाजता आरडा-ओरडा करत फिरणार हा मोठा प्रश्न आहे.
शेतकर्यांनी करावयाच्या उपाययोजना
डाळिंब बागांभोवती सुरक्षा कुंपण.
सीसीटीव्ही यंत्रणेची उभारणी.
शेतात नियमित गस्त घालावी.
शेतकरी सुरक्षा गटांची स्थापना करावी.
स्थानिक पोलिसांशी समन्वय यावर भर द्यावा.