ओतूर : संकटांच्या मालिकेने शेतकरी हतबल; निसर्गाच्या अवकृपेने उभी पिके संपुष्टात

ओतूर : संकटांच्या मालिकेने शेतकरी हतबल; निसर्गाच्या अवकृपेने उभी पिके संपुष्टात
Published on
Updated on

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील बळीराजाचे नुकतेच अतिवृष्टीने बेसुमार नुकसान झाले आहे. पिकांची डोळ्यांसमोर झालेली नासाडी, महागाईचा आगडोंब, दुबार लागवडीची आलेली वेळ, कर्जबाजारीपणा, शेतमालाला मिळत असलेले तुटपुंजे बाजारभाव, बी- बियाणे, रोपे मिळविण्यासाठी सुरू असलेली शोधाशोध, मजूरवर्गाचा तुटवडा व भरमसाट मोजावी लागणारी मजुरी रक्कम आणि त्यातून झालेली अपरिमित आर्थिक हानी, असा अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकर्‍याला हतबल होण्याशिवाय पर्याय उरला नाही.

एकापाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या संकटांच्या मालिकेने शेतीव्यावसाय पुरता अडचणीत आला असून, त्यात भर म्हणून की काय शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पशुधनही अज्ञात चोरटे चोरून नेत असल्यामुळे शेतकरी राजा चोहोबाजूने अडचणीत सापडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकतेच ओतूर, कोळमाथा, धोलवड रस्ता आणि परिसरात अशा पशुधन चोरीच्या घटना घडल्यामुळे ही एक चिंतेची बाब बनली आहे.

आधीच अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे सावट, पिकांचे नुकसान आणि त्यात दुग्धव्यवसायाचा आधार गमावला जात असल्याने तसेच बळीराजाला दोन पैसे हाताशी लागण्याची गरज असताना त्याचीही चोरी होऊ लागल्याने शेतकर्‍यांनी जगावे की मरावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चोरट्याची नामी शक्कल
शेतकर्‍याच्या गोठ्यातील गायी, गुरे चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी नामी शक्कल वापरून गुरांना भूल देऊन फॅमिली कार वापरण्याचा फंडा वापरल्याची बाब समोर येत आहे. कोणालाही संशय येणार नाही आणि आपले पाप उघड होणार नाही, असा विचार करीत आपल्या दुष्कर्माला चालना देत चोरटे आपले कर्म बेमालूमपणे करीत आहेत.

शेतकर्‍यांना वाली आहे का?
अनंत अडचणींचा सामना करीत जगणारा व जगवणार्‍या शेतकर्‍याला कोणी वाली नसल्याने तो एकाकी पडल्याचे बोलले जात आहे. त्यास प्राधान्याने शासनाने सुरक्षितता व आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे. शेतकर्‍यांना पुरेसे अभय मिळत नसल्याने तो असुरक्षिततेची भावना मनात बाळगून आत्महत्येचा विचार मनात आणत आहे. याबाबत शासनाने संपूर्ण लक्ष शेती व्यवसायाकडे केंद्रित करण्याची मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news