

निमगाव दावडी; पुढारी वृतसेवा : भाजीपाला पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतीमध्ये कोणता माल घ्यावा आणि कोणता नाही या चिंतेत तो आहे. सध्या वांग्यांचा भाव खूपच उतरल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथील राणी शिवाजी भांबुरे यांनी शेतीसाठी कंबर कसून कोणता माल शेतीत घ्यावा याची आखणी केली.
त्यांनी वांग्यांची लागवड, खुरपणी, ढगाळ हवामान आल्यावर कोणती औषधे फवारावी यांचा सखोल अभ्यास करून आधुनिक पद्धतीने शेती करून वांग्यांची लागवड केली. त्यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय पद्धतीने नियोजन करून काकडी आणि वांगी यांचे भरघोस उत्पादन घेतले आहे. वांगी झाडे ही पाच ते सहा महिन्यांची झाली आहेत.
मध्यतरी सततच्या पावसामुळे झाडांची वाढ थांबली होती, परंतु आता पुन्हा वांगी झाडांना फूल वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु खेड बाजार समितीमध्ये वांग्यांचे बाजारभाव घसरल्याने मजुरी तसेच वाहतूकदेखील सुटत नसल्याचे भांबुरे यांनी सांगितले. सकाळी वांगी तोड केल्यावर दुपारी मार्केटमध्ये माल विक्रीसाठी नेला जात आहे. मात्र मालास योग्य भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.